पंचहमी योजना महिला सबलीकरणाचा पाया
अधिकाऱ्यांकडून माहिती : गुंजीत पंचहमी शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वार्ताहर/गुंजी
भारतीय संस्कृतीत महिलांना लक्ष्मीचे स्थान असल्याने महिलांना कर्नाटक सरकारने राबविलेल्या पंचहमी योजना महिला सबलीकरणाचा पाया असून महिलांनी त्याचा सदुपयोग करावा, असे उद्गार पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी काढले. शुक्रवारी गुंजी ग्रा. पं.हॉलमध्ये घेण्यात आलेल्या पंचहमी योजनेच्या परिशिलन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजी ग्रा. पं. अध्यक्षा स्वाती गुरव होत्या. स्वागतगीतानंतर रोपट्याला मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना कुलकर्णी यांनी पंचहमी योजनेच्या लाभार्थ्यांशी चर्चा केली. तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी पंचहमी योजना सरकारने जारी केली असून सदर योजनांचा सर्व महिलांनी लाभ घेऊन आर्थिक सक्षम व्हावे. गृहलक्ष्मी योजनेच्या वर्षभराच्या बचतीतून लघुद्योग उभारून कुटुंबाचा आर्थिक मान उंचवावा, तसेच गुंजी कार्यक्षेत्रात एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची आम्ही जातीनिशी दक्षता घेऊ, त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसात गुंजीत जलद बस थांबवण्याची व्यवस्था करू, अशी ग्वाहीही दिली.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या योजनेतील लाभार्थ्यांची माहिती सांगून सदर योजनेत कोणी वंचित राहिल्यास त्यांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा स्वाती गुरव, शांताराम गुरव आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमात परिवहन खात्याचे अधिकारी कांबळे, अन्नपुरवठा खात्याचे अधिकारी खातेदार, हेस्कॉमचे अधिकारी देवलतकर, सहाय्यक बालकल्याण अधिकारी शारदा मॅडम, रेशन दुकानदार संघटना अध्यक्ष वैभव कुलकर्णी, ग्रा. पं.सदस्या राजश्री बिरजे, सरोजा बुरुड, अन्नपूर्णा मादार, श्रावणी शास्त्राr, लक्ष्मण मादार, रावजी बिरजे, गोपाळ देसाई, जोतिबा करंबळकरसह एन. आर. एल. एम. सखी, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, पंचायत कर्मचारी वर्ग आणि महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. पीडीओ विनोद मुतगी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.