राजा शिवाजी संघाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
खानापूर : कर्नाटक सॉफ्टबॉल प्रीमियर लीगमध्ये क्रिकेट सामन्यात बेळगाव राजा शिवाजी संघाची विजयी घोडदौड सुरु असून उपांत्यपूर्व सामन्यात दाखल झाला आहे. दि. 23 नोव्हेंबर रोजी राजा शिवाजी संघ बेळगाव आणि चिक्कमंगळूर संघ यांच्यात उपांत्यपूर्व सामना सायंकाळी 6 वाजता खेळवला जाणार आहे. बेळगावच्या राजा शिवाजी संघाने आतापर्यंत तीन साखळी सामने जिंकले आहेत. यात म्हैसूर महाराजा संघाचा पराभव करत सुपर 16 मध्ये प्रवेश मिळविला. प्रथम फलंदाजी करताना म्हैसूरने 9 षटकात 9 बाद 55 धावा जमविल्या. महेश चंदनने सर्वाधिक 13 धावा जमविल्या. राजा शिवाजीच्या संतोष सुळगे-पाटीलने 10 धावा देत चार तर रब्बानी दफेदारने दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना राजा शिवाजीने दोन गडी गमावून तीन षटके बाकी असताना विजय मिळविला. संतोष सुळगे-पाटीलने नाबाद 24 तर प्रसादने नाबाद 19 धावा जमविल्या. आठ गडी राखून बेळगाव संघाने विजय संपादन करत पुढील फेरी गाठली. संतोष सुळगे-पाटील सामनावीर तर प्रसाद नाकाडीला सुपर स्ट्रायकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच तिसऱ्या सामन्यात राजा शिवाजी संघाने यादगीर योद्धा संघाचा 51 धावानी पराभव केला. यात संतोष पाटील यांने 17 चेंडूत 42 धावा केल्या. तसेच दोन षटकात 11 रन देत 2 फलंदाज बाद केले. यादगीर संघावर विजय मिळविल्याने आता राजा शिवाजी संघाने उपांत्य फेरीत सामन्यात धडक मारली आहे.