मनसे होणार महायुतीमध्ये सामिल; जागांच्या वाटाघाटीवर वरिष्ठ स्थरावर चर्चा
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा जवळपास अंतिम झाला असतानाच राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षही महायुतीमध्ये सामिल होण्याच्या तयारीमध्ये आहे. मनसे बरोबर जागावाटपाची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असून भाजपच्या वाट्याची दक्षिण मुंबईमधील जागा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या काही महीन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप- शिवसेने (शिंदे गट ),आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्या महायुतीमध्ये सामिल होणार असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही काही दिवसांपासून मनसेच्या शाखांना भेट देऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला होता. तसेच शाखाध्यक्षांना संपर्क वाढवण्याचे निर्देश देऊन जागावाटपाचे निश्चित झाल्यावर योग्य त्या सुचना मिळतील असेही सांगण्यात आले होते.
अखेर मनसेच्या महायुतीमधील समावेशाला भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून हिरवा कंदिल मिळाला असून हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे महायुतीमध्ये सामिल होत असल्याचा निर्वाळा भाजपच्या प्रवक्त्यांनी दिला आहे. तसेच मनसेचा प्रादेशिकतेचा मुद्याही भाजपने मान्य केला असून त्यावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नसल्याचं म्हटलं आहे.
महत्वाच्या जागावाटपाच्या तिढ्यासंदर्भात मनसेला भाजपच्या वाट्याला गेलेला दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून संधी मिळू शकते. भाजपने मनेला महायुतीच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह धरला असला तरी तो अजूनही मनसेकडून मान्य झालेला नाही.