For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘राज’ घोषणा

06:38 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘राज’ घोषणा
Advertisement

प्रथेप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विराट गर्दी आणि मोठे शक्तीप्रदर्शन करत मुंबईत शिवतीर्थवर सेनेचा मेळावा घेतला आणि आपले मनोगत सांगत लोकसभेसाठी महाराष्ट्रात महायुतीला पाठींबा जाहीर केला. आपला पाठींबा बिनशर्त व केवळ नरेंद्र मोदींसाठी आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. आपली बांधिलकी, युवकाशी, विकासाशी आणि महाराष्ट्र व मराठीशी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुढीपाडवा मेळाव्या दरम्यान ते निवांत वाटत होते. घरात नातवाला खेळवताना त्यांचा व्हिडीओ दूरचित्रवाणीवरून सतत दाखवला जात होता. गेल्या काही दिवसांच्या हालचाली आणि गाठीभेटी लक्षात घेता राज ठाकरे महायुतीत सहभागी होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि राज ठाकरे महायुतीत आले तर त्यांना लोकसभेच्या कोणत्या जागा दिल्या जातील, मुंबईत किती फरक पडेल, राज ठाकरे मुंबई महापालिकेच्या आणि विधानसभेच्या किती जागा मागतील, राज ठाकरे इन झाले तर त्याचा शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यावर काय परिणाम होईल वगैरे तर्क लढवले जात होते. भाजपा नेते अमित शहा आणि राज ठाकरे यांची दिल्लीत झालेली भेट व चर्चा यावरूनही तर्कवितर्क बांधले जात होते. राज ठाकरे यांची एन्ट्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जड जाईल विशेषत: मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असेही अंदाज व्यक्त होत होते. पण, राज ठाकरे यांनी आपण ट्रेलर, टिजर न दाखवता एकदम पूर्ण सिनेमाच दाखवू असे म्हणत शहा भेटीनंतर मौन पाळले होते. ओघानेच गुढीपाडवा मेळाव्यात ‘राज’ घोषणा काय होते याकडे सर्वांचे लक्ष होते व अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी महायुतीला पाठींबा जाहीर केला व या निर्णयाचे तातडीने विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी स्वागत केले. वरवर पाहता गुढीपाडवा मेळाव्याचे हेच दर्शनी सार होते पण, एकूण तपशील पाहता राज ठाकरे यांनी बिनशर्थ पाठींबा देताना जी भाषा वापरली व विश्लेषण केले ते पाहता राज ठाकरे यांना महायुती फार पसंत आहे व त्यांनी उत्स्फूर्तपणे समर्थन दिले असे दिसले नाही. 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींचे सर्वप्रथम आपण समर्थन केले आणि भाजपाने त्यांचे पंतप्रधान पदासाठी समर्थन करण्यापूर्वी आपणच ते पंतप्रधान झाले पाहिजे असे म्हटले होते. पण, नंतर आपला प्रवास ‘लाव तो व्हिडीओ’ पर्यंत कसा झाला व आज आपण मोदींसाठी महायुतीला समर्थन का देतो आहे याचा स्पष्ट खुलासा केला. जे चांगले ते चांगले व जे वाईट ते वाईट हा आपला बाणा आहे. असे सांगत 370 कलम रद्द केले, राम मंदिर उभारणी केली. यांचे आम्ही खुले स्वागत केले. त्यामागे हाच बाणा होता आणि लाव तो व्हिडीओ मागे तोच बाणा असे सांगून आपली  भूमिका तीच आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. राज ठाकरे महायुतीत सहभागी झालेले नाहीत ते महायुतीचे सहभागी सदस्य नाहीत. त्यांनी केवळ बिनशर्थ पाठींबा दिला आहे. त्यांनी बिनशर्थ पाठींबा देताना विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद जागा वगैरे काही मागितलेले नाही. वा कोणत्याही अटी घातलेल्या नाहीत. आपले स्वतंत्र अस्तित्व आणि भूमिका यातही कोणताही बदल नाही आपले चिन्ह पक्षाचे नाव यातही बदल नाही असे म्हटले आहे. भाषणात महाराष्ट्र देशाला सर्वात जास्त महसूल देतो, तुलनेने महाराष्ट्राला निधी मिळत नाही, यावर जसे बोट ठेवले तसा राजकारणाचा जो चिखल झाला आहे त्यावरही स्पष्ट नाराजी व्यक्त केली व महाराष्ट्रातील जनतेने राजकीय व्यभिचाराला कोणत्याही स्वरूपात समर्थन देऊ नये असे जाहीर आवाहन केले. कमी जास्त प्रमाणात या व्यभिचाराची लागण सर्वच पक्षाना झाली आहे. विचार, तत्वज्ञान, आदर्शवाद, लोकहित हे सारे गुंडाळून हव्या त्या भूमिका व उलटसुलट उड्या, याना धरबंध राहिलेला नाही. टिकेची आणि स्वार्थाची पातळी किळसवाण्या पातळीवर गेली आहे. या राजकारण्यांना सर्वसामान्य जनता उबगली आहे. हा व्यभिचार थांबायला तयार नाही. यावर आता मतदारांनीच भूमिका घेतली पाहिजे हे त्यांचे विवेचन अत्यंत बोलके होते. राज ठाकरे लोकांच्या मनातले बोलतात याची या विश्लेषणाने प्रचिती आली. तथापि राजकारणातले टगे जातीधर्माच्या टोळ्या करून भावनिक आवाहने करून पाण्यासारखा पैसे ओततात व आपणास हवे ते साधतात याकडेही दुर्लक्ष करता येत नाही. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना टिकेचे लक्ष केले. पण, नेहमीची सोलटून काढणारी धाटणी नव्हती. त्यांनी या भाषणात कुणाची मिमिक्री केली नाही. लोकसभा प्रचारात सहभागी होणार की नाही होणार, याबद्दलही मौन पाळले. बिनशर्त पाठींबा की महाआघाडीच्या पराभवासाठी जीवाचे रान हे स्पष्ट झाले नाही. राज ठाकरे यांनी भारत हा युवकांचा देश आहे त्याला नव्या प्रगत अर्थव्यवस्थेत महत्वाचे स्थान असून त्यांच्या हाताला काम आणि महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास व प्रगतीसाठी मोठा निधी अशा अपेक्षा बाळगल्या आहेत. राज ठाकरे यांनी केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावर समर्थन दिलेले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी महायुतीचे बोट धरले असले तरी त्यांनी आपले मत आणि अधिकार राखून ठेवला आहे. युतीच्या नेत्यांनी त्याचे भान ठेवले पाहिजे. पाडव्याच्या मुहूर्तावरच शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी महाआघाडीची सर्व 48 जागांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर प्रतिक्रिया उमटल्या. सांगलीत तर आश्चर्य व संताप अशा भावना उमटल्या आहेत. सांगलीसह काही ठिकाणी बंडाची भाषा ऐकू येत आहेत. सांगली जिल्हा म्हणजे वसंतदादा पाटील व काँग्रेस अशी ओळख या निवडणुकीत पुसण्याचा प्रयत्न झाला आहे. जिल्ह्यात लोकसभेचे दीड मतदारसंघ आहेत. एक सांगली आणि अर्धा हातकणंगले. सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा हे विधानसभा मतदार संघ, हातकणंगले मतदार संघात समाविष्ट आहेत. आघाडीतून हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला जाहीर झाले. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते काय करतात हे बघावे लागेल. पण, त्याचे परिणाम काँग्रेसला पक्ष म्हणून भोगावे लागणार हे वेगळे सांगायला नको. नेत्यांनी काही ठरवले आणि कानावर हात ठेवून आपलेच म्हणणे खरे केले तर कार्यकर्ते करेक्ट कार्यक्रम करतात. तूर्त राज ठाकरे यांचे आणि महादेव जानकर यांचे समर्थन महायुतीला मिळाल्याने देवेंद्र फडणवीस यांचे मिशन यशस्वी झाले आहे. ‘राज’ घोषणा अपेक्षीत होतीच पण, तिचा प्रभाव, सहभाग व परिणाम हळूहळू स्पष्ट होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.