Raj and Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र यावेत म्हणून नेमकं पुढाकार कोण घेतंय?
'त्या' भेटीमुळे राजकारणातील सर्वात मोठ्या फँटसीचा विचका होण्याची शक्यता
By : प्रवीण काळे, मुंबई
Raj and Uddhav Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार, अशा जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. गेल्याच आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील बहुतेक ठिकाणी या दोन्ही नेत्यांना एकाच बॅनरवर शुभेच्छा दिल्याचे बघायला मिळाले.
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटासोबत असलेला एक कार्यकर्त्यांचा वर्ग आहे, जो केवळ ठाकरेंसोबतच कायम राहिलेला आहे. त्याने ना एकनाथ शिंदे, ना भाजप असा कोणताच पर्याय निवडलेला नाही. हेच कार्यकर्ते ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला मनसे नेते संदीप देशपांडे आणि शिवसेना नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर एकत्र आल्याचे बघायला मिळाले. ठाकरे बंधूंच्या आणि राष्ट्रवादीतील काका-पुतणे यांच्या एकत्र येण्याचीच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या एका भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील या सर्वात मोठ्या फँटसीचा विचका होण्याची शक्यता आहे.
कारण ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीसाठी चांगली राजकीय वातावरणनिर्मिती झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरातील एका हॉटेलमध्ये राज आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट झाली. उध्दव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’पासून काही अंतरावर ही भेट झाली.
राज-उध्दव एकत्र येण्याच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री आणि राज यांची भेट झाली, मात्र विशेष म्हणजे राज आणि उध्दव यांची भेट होऊ शकलेली नाही. तसेच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात देखील भेट झालेली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा कायम आहे.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र दोन्ही भाऊ एकत्र येण्याबाबत काही अडथळा किंवा अडचण नसल्याचे वक्तव्य केले आहे. मुंबई महापालिका निवडणुका भाजपने महायुती म्हणून न लढता स्वबळावर लढल्यास सगळ्यात मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसणार आहे.
त्यातच आगामी बिहार विधानसभा निवडणूक बघता ज्या उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली, त्या पक्षाला भाजप सोबत घेऊन बिहारमधील मतदारांना नाराज करणार नाही. गेल्यावेळच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी मूळचा बिहारचा असलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचा मुद्दा बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच गाजला होता.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहारचे पोलीस मुंबईत आले होते, आणि उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यावेळी मुंबई पोलीस विरूद्ध बिहार पोलीस असा सामना रंगला होता. त्यामुळे राजकारणात कधी कुठला मुद्दा मोठा करत नागरिकांसमोर आणला जाईल हे सांगता येत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट नेमकी का घेतली? या भेटीचा तपशील देखील बाहेर आलेला नाही. त्यामुळे या भेटीनंतरही राज-उध्दव एकत्र येण्याची चर्चा सर्वत्र कायम आहे. गुरुवार, 19 जून रोजी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांचा वर्धापन दिन होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता, दोन्ही शिवसेना आपल्या भूमिका जाहीर करु शकतात.
शिवसेना महायुती म्हणून लढणार की स्वबळावर तसेच ठाकरेंची शिवसेना आघाडीत लढणार की मनसेसोबत युतीत लढणार याबाबतची भूमिका पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर करू शकतात. त्यामुळे 19 जूनला होणाऱ्या वर्धापनदिनाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.