रायझा धिल्लाँला नेमबाजीत दोन सुवर्ण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी भारताची महिला नेमबाज तसेच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेली रायझा धिल्लाँने महिलांच्या स्किट नेमबाजी प्रकारात दोन सुवर्णपदके मिळविली. तिने या क्रीडा प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठांच्या विभागात हे यश मिळविले.
वरिष्ठ महिलांच्या स्किट नेमबाजी प्रकारात 21 वर्षीय रायझा धिल्लाँने 56 शॉट्स नोंदवित सुवर्णपदक हस्तगत केले. या क्रीडा प्रकारात यशस्वी राठोडला 55 शॉट्ससह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. भारताची आणखी एक आंतरराष्ट्रीय दर्जाची महिला नेमबाज गनेमत सेखॉला या क्रीडा प्रकारात 45 शॉट्ससह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारातील झालेल्या पात्र फेरीत यशस्वी राठोडने 118 शॉट्ससह पहिले स्थान तर रायझा धिल्लाँ आणि गनेमत सेखॉ यांनी प्रत्येकी समान 116 शॉट्ससह दुसरे स्थान मिळविले होते. पण अंतिम फेरीत धिल्लाँने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
कनिष्ठ महिलांच्या स्किट नेमबाजीत रायझा धिल्लाँने आपले वर्चस्व राखताना 55 शॉट्ससह सुवर्णपदक, वनशिखा तिवारीने 54 शॉट्ससह रौप्य पदक तर मानसी रघुवंशीने 45 शॉट्ससह कांस्यपदक मिळविले. वरिष्ठ महिलांच्या सांघिक स्किट प्रकारात यशस्वी दर्शना आणि माहेश्वरी चौहान यांनी सरासरी 343 शॉट्स नोंदवित राजस्थानला सुवर्णपदक मिळवून दिले. मध्यप्रदेशने या क्रीडा प्रकारात 328 शॉट्ससह रौप्य पदक तर पंजाबने 325 शॉट्ससह कांस्यपदक घेतले. कनिष्ठ महिलांच्या सांघिक स्किट नेमबाजीत मध्यप्रदेशने सुवर्ण, राजस्थानने रौप्य तर पंजाबने कांस्यपदक मिळविले.