अनियमित पाणीपुरवठ्याबाबत उठविला आवाज
एल अँड टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नगरसेवकांनी विचारला जाब
बेळगाव : शहरात अनियमित पाणीपुरवठ्यामुळे एल अँड टी कर्मचाऱ्यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. बसवन कुडची तसेच इतर भागात आठ ते दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर बंद असलेल्या सार्वजनिक कूपनलिका केव्हा सुरू करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नगरसेवकांना तोंड द्यावे लागत आहे. काही भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली. तसेच कोणत्याही ठिकाणी खोदकाम करताना संबंधित नगरसेवकाला माहिती देऊनच कामाला सुरुवात करण्याचे सांगण्यात आले.
रामलिंगखिंड गल्ली येथे जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू असून जेसीबीच्या साहाय्याने जलवाहिन्या घातल्या जात असल्याने रस्त्याचे नुकसान होत आहे. त्याऐवजी मशीनने रस्ता कटींग करून त्यानंतर जलवाहिनी घालण्याच्या सूचना करण्यात आल्या. शहरातील अतिक्रमणाबाबतही चर्चा झाली. अतिक्रमण होत असल्याने सर्वांनाच त्याचा फटका बसतो. स्थानिक नगरसेवकांना अतिक्रमण काढून घ्या, असे सांगणे नागरिकांना शक्य नसते. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना अतिक्रमणाबाबत माहिती दिली जाते. परंतु, काही ठिकाणी अधिकाऱ्यांनी जाऊन नगरसेवकांची नावे सांगितल्याने तेथे वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे कोणताही वाद निर्माण होईल, असे न करता शहरातील अतिक्रमणे हटविण्याची सूचना धोंगडी यांनी केली.
सत्ताधारी गटातच शाब्दिक चकमक
वडगाव, आनंदनगर परिसरात ड्रेनेजचे काम करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली केल्याने नवीन कामगारांना काम करताना समस्या येत असल्याची तक्रार नगरसेविका सारिका पाटील यांनी मांडली. त्याचवेळी नगरसेवक रवी धोत्रे यांनीही जोरदार आक्षेप घेतला. परंतु, सत्ताधारी काही नगरसेवकांना या समस्येबाबत गांभीर्य नसल्याने रवी धोत्रे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे सत्ताधारी गटाचे गटनेते गिरीश धोंगडी व रवी धोत्रे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली.