For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गाबा कसोटीच्या पहिल्या दिवसावर पावसाचे पाणी

06:58 AM Dec 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
गाबा कसोटीच्या पहिल्या दिवसावर पावसाचे पाणी
Advertisement

आकाशदीप व रविंद्र जडेजाला संधी, हर्षित राणा, अश्विनला वगळले

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. ब्रिस्बेनमध्ये शनिवारी पाऊस झाला. दिवसाच्या शेवटच्या दोन सत्रात एकही चेंडू टाकता आला नाही. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ढगाळ स्थिती पाहून नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु पहिल्या सत्रात 13.2 षटके टाकल्यानंतर सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे खेळ पुन्हा सुरु होऊ शकला नाही. पहिल्या दिवस वाया गेल्यानंतर पंचांनी आता या सामन्याच्या शेवटच्या चार दिवसांच्या सुरुवातीच्या वेळेत बदल केला आहे.

Advertisement

गाबा कसोटी सामन्यात पावसाची शक्यता आधीच होती, त्याचा परिणाम पहिल्या दिवसाच्या खेळावरही दिसून आला. पहिल्या सत्रात पावसामुळे पंचांना दोनवेळा खेळ थांबवावा लागला, त्यात पहिल्या सत्रात काही वेळाने खेळ पुन्हा सुरू झाला, मात्र दुसऱ्यांदा जोरदार पाऊस सुरू झाल्याने पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. आता गाबा कसोटी सामन्याच्या शेवटच्या चार दिवसांत प्रत्येक दिवशी एकूण 98 षटके टाकली जातील, ज्यामध्ये सामना निर्धारित वेळेच्या अर्धा तास आधी सुरु होईल. बीसीसीआयने ट्विट करून माहिती दिली आहे की, पुढील चार दिवसांचा खेळ भारतीय वेळेनुसार पहाटे 5:20 वाजता सुरू होईल, जो पूर्वी पहाटे 5:50 वाजता सुरु होणार होता.

कांगारुंच्या बिनबाद 28 धावा

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 13.2 षटकात बिनबाद 28 धावा केल्या आहे, ज्यामध्ये उस्मान ख्वाजा 19 आणि नॅथन मॅकस्वीनी 4 धावांवर नाबाद फलंदाजी करत होते. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये दोन मोठे बदल दिसले आहेत. ज्यात हर्षित राणा आणि रविचंद्रन अश्विनच्या जागी आकाश दीप आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघातील प्लेइंग 11 मध्ये स्कॉट बोलँडच्या जागी जोश हेजलवूडचे पुनरागमन झाले आहे.

दुसऱ्या दिवशी किरकोळ पावसाची शक्यता

हवामानखात्याच्या अंदाजानुसार, रविवारी पावसाची शक्यता केवळ 8 टक्के आहे. परंतु दिवसभर आकाश ढगाळ राहू शकते. असे असले तरी अनेक वेळा हलक्या पावसामुळे खेळ थांबण्याची शक्यता आहे. एकूणच दुसऱ्या दिवशीही संपूर्ण षटके क्वचितच टाकली जातील. सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात जोरदार वारे वाहत होते आणि दुसऱ्या दिवशीही ताशी 15 किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. पहिला दिवस गाबाचे मैदान तलावासारखे दिसत होते. खेळपट्टीभोवतीचे संपूर्ण मैदान पाण्याने भरलेले दिसत होते. गाबा मैदानाची ड्रेनेज व्यवस्था जागतिक दर्जाची आहे. मात्र रात्रीही उशिरा पाऊस झाल्यास दुसऱ्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होऊ शकतो.

स्विंग होत नाही, बुमराह वैतागला

रोहित शर्माने हवामानाचा अंदाज पाहता गोलंदाजांना मदत मिळेल या हिशोबाने तिसऱ्या कसोटीत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण प्रत्यक्षात सामना सुरू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज चांगली फलंदाजी करताना दिसले. सामन्यादरम्यान बुमराह पाचव्या षटकात चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न करत होता, पण खेळपट्टी फारशी मदत करत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. बुमराहचा पाचव्या षटकातील एक व्हीडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये स्टंप माईकमध्ये त्याचा बोलतानाचा आवाजही रेकॉर्ड झाला आहे. पाचव्या षटकातील पहिला चेंडू टाकल्यानंतर बुमराह शुभमन गिलबरोबर बोलताना म्हणाला, चेंडू खूप वर आहे. चेंडू स्विंग होत नाहीय, कुठेही टाकू शकतो.

Advertisement
Tags :

.