For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॅमिल्टनच्या वनडे सामन्यावर पावसाचे पाणी

07:45 AM Nov 28, 2022 IST | Tarun Bharat Portal
हॅमिल्टनच्या वनडे सामन्यावर पावसाचे पाणी
Advertisement

वृत्तसंस्था/ हॅमिल्टन

Advertisement

यजमान न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील रविवारचा दुसरा वनडे सामना पावसामुळे रद्द करावा लागला. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडने पहिला सामना जिंकून भारतावर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला ख्राईस्टचर्च येथे खेळविला जाईल.

भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये टी-20 आणि वनडे मालिका खेळण्यासाठी दाखल झाल्यानंतर पावसाचा अडथळा वारंवार आला. टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना भारताने जिंकून न्यूझीलंडवर आघाडी घेतली होती. तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात पुन्हा पावसाचा अडथळा आला आणि डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे ही लढत टाय (बरोबरीत) राहिल्याने भारताने ही मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. या मालिकेनंतर उभय संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ झाला. न्यूझीलंडने या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा सात गडय़ांनी दणदणीत पराभव केला. भारताने 300 धावांचा टप्पा ओलांडूनही कर्णधार विल्यम्सन आणि लॅथम यांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे भारताला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. भारताची गोलंदाजी कमकुवत ठरली.

Advertisement

रविवारच्या दुसऱया सामन्यात पावसाचा दोनवेळा अडथळा आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 12.5 षटकात 1 बाद 89 धावा जमवल्या असताना पावसाला पुन्हा सुरुवात झाली. तसेच पुन्हा खेळ सुरू होण्याची शक्यता दुरावली. त्यामुळे या सामन्यात किमान 20 षटकांचा खेळ झाला नसल्याने पंचांनी हा सामना रद्द झाल्याची घोषणा केली. खेळाला सुरू झाल्यानंतर भारताने 5 षटकात बिनबाद 22 धावा जमवल्या असताना पावसामुळे पहिल्यांदा खेळ थांबवला गेला. पावसामुळे चार तासांचा कालावधी वाया गेला होता त्यामुळे पंचांनी हा सामना प्रत्येकी 29 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाला पुन्हा सुरुवात झाली आणि 12.5 षटकांचा खेळ झाला असताना पावसाचे दुसऱयांदा आगमन झाले. त्यामुळे पंचांनी काही वेळ वाट पाहून सामना रद्द झाल्याचे सांगितले.

भारताच्या डावामध्ये कर्णधार शिखर धवन 3 धावावर बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी अभेद्य 66 धावांची भागीदारी केली. गिलने 42 चेंडूत नाबाद 45 तर सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत नाबाद 34 धावा जमवल्या. गिलच्या खेळीमध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. गिलने हेन्रीच्या गोलंदाजीवर पुलचा षटकार मारला. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार फलंदाजी करणाऱया सूर्यकुमार यादवने नाबाद 34 धावांमध्ये 3 षटकार खेचले. त्यापैकी एक षटकार त्याने मिडविकेटच्या दिशेने चेंडू स्वीप करत नोंदवला. सूर्यकुमारने आपला दुसरा षटकार स्क्वेअरलेगच्या मागे स्वीप फटक्यावर नोंदवला. तिसरा षटकार पुलच्या फटक्यावर नोंदवला. डिसेंबर ते मार्चच्या दरम्यान सहसा आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ नेहमीच न्यूझीलंडचा दौर करीत असतात. पण यावेळी न्यूझीलंडचे हवामान खूपच बदलल्याने पावसाच्या समस्येमुळे सामन्यावर विपरीत परिणाम होत आहे.

Advertisement
Tags :

.