पहिल्या टी 20 सामन्यावर पावसाचे पाणी
वृत्तसंस्था/ कॅनबेरा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. कॅनबेरामध्ये या सामन्यात पावसाचा बराच व्यत्यय आला. यामुळे सामन्यातील षटकेही कमी करण्यात आली होती. मात्र दुसऱ्या ब्रेकनंतर पाऊस मुसळधार झाल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला. उभय संघातील दुसरा सामना दि. 31 रोजी मेलबर्न येथे खेळवला जाईल.
प्रारंभी, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. अभिषेक नेहमीप्रमाणे त्याच्या शैलीत आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने सुरुवातीपासूनच मोठे शॉट्स खेळले होते. पण, त्याला चौथ्या षटकात नॅथन एलिसने बाद केले. त्याने 4 चौकारांसह 19 धावांचे योगदान दिले. यानंतर पाचव्या षटकांत पावसाला सुरुवात झाली. तासाने पुन्हा सामना सुरू झाल्यानंतर 18-18 षटकांचा सामना करण्यात आला होता. सूर्याने नेहमीच्या अंदाजात खेळताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये 150 षटकारही पूर्ण केले. गिल आणि सूर्यकुमार यांनी अर्धशतकी भागीदारीही केली होती. पण 10 व्या षटकादरम्यानही पुन्हा जोरात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पुन्हा सामना थांबवण्यात आला. पाऊस न थांबल्याने अखेरीस सामनाधिकाऱ्यांनी हा सामना रद्द केला. सूर्या 39 तर गिल 37 धावांवर नाबाद राहिले. 
सूर्याचा आणखी एक कारनामा
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात सूर्याने 24 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 39 धावांची खेळी केली. हेजलवूडच्या गोलंदाजीवर सूर्याने लगावलेला त्याचा ट्रेडमार्क गगनचुंबी षटकार कमालीचा होता. यादरम्यान, सूर्याने आपल्या टी-20 कारकिर्दीत 150 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील फक्त पाचवा फलंदाज बनला आहे. या यादीत भारताचा रोहित शर्मा 205 षटकारासह अव्वलस्थानावर आहे.