गोव्याला पावसाने पुन्हा झोडपले
पणजी : गोव्याला शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले. 24 तासात गोव्यात सरासरी चार इंच पावसाची नोंद झाली असून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्या, नाले भरून वाहत असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीज खात्याचे देखील बरेच नुकसान झाले आहे. शनिवारी रात्रभर पाऊस कोसळला आणि रविवारी पुन्हा एकदा मुसळधार पावसाबरोबरच जोरदार वादळी वारे सर्वत्र वाहत होते. हवामान खात्याने दुपारी रेड अलर्ट जारी केला. सायंकाळी चार वाजता पावसाचा जोर वाढत गेला व सायंकाळी साडेसात नंतर जोर थोडा कमी झाला.
हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडेल, असे म्हटले आहे. आज दिवसभर संपूर्ण गोव्यात जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक पावणे सहा इंच पाऊस सांगे येथे पडला. धारबांदोडा येथे पाच इंच, जुने गोवेत साडेचार इंच, पणजीत सव्वाचार इंच, फोंडा येथे सव्वा चार इंच, मुरगाव चार इंच, सांखळी साडेतीन इंच, काणकोण तीन इंच, पेडणेत अडीच इंच, तर म्हापसा येथे दीड इंच पावसाची नोंद झाली आहे. एकंदरीत गेल्या 24 तासात चार इंच पावसामुळे यंदाच्या मोसमत आतापर्यंत 15 इंच पावसाची नोंद झाली आहे. आज व उद्या दोन दिवसांकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस येलो अलर्ट आहे. या दरम्यान गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. दरम्यान हवामान खात्याने रात्री दिलेल्या माहितीनुसार पणजीत रविवारी रात्र साडेआठपर्यंत अडीच इंच पावसाची नोंद झाली. हा बारा तासातील पाऊस होता. पणजीत दुपारपासून मुसळधार पाऊस पडला.