पाऊस सर्वदूर दमदार, सरासरी ओलांडली
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने नुकताच वर्तविला आहे. त्यामुळे हे दोन महिनेही पावसाने व्यापलेले पहायला मिळणार आहेत. मान्सूनची सुरुवात यंदा मे मध्येच नेहमीच्या अंदाजापेक्षा 7 ते 8 दिवस आधीच केरळमध्ये झाली होती. 24 मे रोजी मान्सून केरळमध्ये यंदा दाखल झाला होता. त्यानंतर केवळ दोनच दिवसांमध्ये मुंबईला पहिल्या पावसाने झोडपले होते. सध्याला मान्सूनने भारतात सर्वदूर पोहोचत शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच दिलासा देण्याचे काम केले आहे. यातही ऑगस्ट महिन्यात पूर्वोत्तर भारतामध्ये विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज सांगितला गेला आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचे भाकीत करण्यात आले असून जून आणि जुलै महिन्यात भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हिमाचलप्रदेश सारख्या राज्याला अतिवृष्टीमुळे पूरासारख्या घटनांना सामोरे जावे लागले आहे. नैऋत्य पावसाचे प्रमाण दुसऱ्या सहा माहीमध्ये 106 टक्के इतके असू शकते, असेही म्हटले जात आहे.
मध्यभारतात आणि नैऋत्य भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पुढील सहा महिन्यामध्ये होऊ शकतो. 1 जून ते 31 जुलै या कालावधीत देशात 474 मि.मी. इतका पाऊस पडला आहे. मागच्यावर्षी हेच प्रमाण 445 मि.मी. इतके होते. म्हणजेच मागच्या तुलनेमध्ये 6 टक्के पाऊस अधिक पडला आहे. देशामध्ये जोरदार पावसाच्या जवळपास 624 घटना घडलेल्या असून अतिवृष्टीच्या 76 घटना घडलेल्या आहेत. ईशान्य भारतात मात्र यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. असे होण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. म्हणजेच ईशान्य भारतामध्ये पावसाचे प्रमाण सातत्याने कमी होताना पहायला मिळते आहे. यंदाच्या मे महिन्यात 126 मि.मी. इतका पाऊस भारतात नोंदला गेला जो 1901 नंतर पाहता सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस नोंदला गेला आहे. मे मध्येच मध्यभारतात मान्सूनने हजेरी लावली होती. 29 जूनला मान्सूनने संपूर्ण देश व्यापला होता. हा सुद्धा एक प्रकारचा विक्रमच म्हणायला हवा. नेहमीप्रमाणे वेळेच्या 9 दिवस आधी संपूर्ण देश मान्सूनने व्यापला होता. गुजरातमध्ये 288 मि.मी. पावसाची नोंद झाली असून वलसाडमध्ये जवळपास 850 मि.मी. पावसाची विक्रमी नोंद यंदा झाली आहे. जूनमध्ये एकंदर 288 मि.मी. पाऊस झाला आहे. दशकभरामध्ये पाहता हे प्रमाण अधिक आहे. 1 जून रोजी आसामच्या सिलचरमध्ये एकाच दिवशी 415 मि.मी. इतका विक्रमी पाऊस पडला होता. 1893 मधला विक्रम या पावसाने मोडीत काढला. 132 वर्षांनंतर सिलचरमध्ये वरील प्रमाणे विक्रमी पाऊस पडला.
राज्यांचा विचार करता राजस्थान, लडाख, नागालँड, मणिपूर आणि सिक्कीम या राज्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडला आहे. राजस्थान सारख्या राज्यांनीही यंदा दमदार पावसाचा अनुभव घेतला आहे. या राज्यांमध्ये तब्बल 384 मि.मी. इतका पाऊस यंदा पडला होता तसे पाहता या ठिकाणी सरासरी 200 मि.मी. पावसाची नोंद कमाल नोंदविली जाते. सिक्कीममध्ये 598 मि.मी. पावसाची नोंद झाली असून नेहमी पेक्षा या ठिकाणी 78 टक्के पाऊस जास्त नोंदविला गेला आहे. मध्यप्रदेश, गुजरात, दादरा आणि नगरहवेली तसेच दमन व दिव, झारखंड आणि आसाममध्ये जवळपास 20 ते 59 टक्के पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडला आहे. मध्यप्रदेशातही 645 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सरासरीपेक्षा 54 टक्के पाऊस अधिक झाला आहे. या व्यतिरिक्त उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हिमाचलप्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओडीसा, गोवा, त्रिपुरा, मिझोरम, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मिर, छत्तीसगड आणि पुडुचेरी या ठिकाणी सरासरी इतकाच पाऊस झालेला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये मात्र 521 मि.मी. पाऊस झाला आहे. जो फारच कमी आहे. यापूर्वी तेथे 942 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच बिहारमध्ये सुद्धा 43 टक्के पाऊस मागच्या तुलनेमध्ये कमी झाला आहे.
-दीपक कश्यप