ऐन सुगीच्यावेळी पावसाची रिपरिप
हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल : पिकेही झाली आडवी
वार्ताहर/येळळूर
हातातोंडाशी आलेला घास शेतात उभा असताना समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेला आठवडाभर शेतकऱ्यांची पावसाने पाठ धरली आहे. रोजच पडणाऱ्या पावसाने पिकून पक्व झालेल्या विकात पुन्हा पाणी साचले आहे. मध्यंतरी सुटलेल्या वाऱ्यामुळे पिके आडवी झाली असून, पाऊस असाच सुरू राहिला तर त्यावर पाणी साचण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. यावर्षी पेरणीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ धरली असून, सुरवातीला पेरणी केलेली बियानेच अति पावसाने कुजली. त्यानंतर काही ठिकाणी दुबार पेरणी तर काही ठिकाणी रोप लावणी तर बहुतांश ठिकाणी पावसात तग धरून राहिलेल्या रोपांची विरळणी करून शेतकऱ्यांनी वाफे हिरवीगार केले आणि खतांचा वापर करत पिके जोपासली.
यावर्षी रोगाचा प्रादुर्भाव ही कमी असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडतील अशी आशा असतानाच ऐन पीक कापणीच्या वेळीच निसर्ग कोपल्याने पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. या बदललेल्या निसर्ग चक्रामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र कोलमडले जात असून, शेतकऱ्यांना मात्र अजून यावर उपाय मिळत नसल्याने तो गोंधळला आहे. गेली काही वर्षे शेतकरी या चक्रात भरडला जात आहे. तो पुन्हा पुन्हा कर्जाच्या बोझाने दबला जात आहे. एकीकडे शहरात धुमधडाक्यात दिवाळी साजरी होत असताना शेतकऱ्याला मात्र पावसामुळे दिवाळी सणात मन लागले नाही.
होणाऱ्या अति पावसामुळे त्याचे डोळे आभाळाकडे तर मन शेतातील पिकात फिरत होते. हातचा घास असा उभ्या पावसात भिजताना बघून त्याचा जीव तीळतीळ तुटतो आहे. येळळूर परिसरातील प्रसिद्ध बासमती तांदळाला पुन्हा या वर्षाही पावसाचा फटका बसला आहे. चिंटु, कावेरी सारखी थोडी फार पिके पावसाचा मारा सहन करीत उभी आहेत. बासमती पिकाला जरी उतारा कमी मिळत असला तरी त्याला मिळणारा दर बघता या पिकाकडे शेतकरी तोटा सहन करूनही वळत असतो. पण प्रत्येक वर्षी याला रोग आणि पाऊस याचा फटका बघता शेतकरी हळुहळू दुसऱ्या बियाणाकडे वळत असल्याचे चित्र आहे.