For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फलटण, माणमध्ये पावसाने दाणादाण

03:02 PM May 26, 2025 IST | Radhika Patil
फलटण  माणमध्ये पावसाने दाणादाण
Advertisement

सातारा, म्हसवड :

Advertisement

सातारा जिह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही फलटण तालुक्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बाणगंगा, माणगंगा नदीला पूर आला असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. फलटणमध्ये एका ओढ्याला पूर आल्यामुळे दुचाकीस्वार मध्येच अडकला होता. स्थानिकांना त्याला वाचवण्यात यश आले. दहिवडी -फलटण रस्ता पाण्याखाली गेला आहे. माणगंगेला आलेल्या पुरामुळे म्हसवडमधील बाजार पटांगणावर मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. तर पुलही पाण्याखाली गेला आहे. नागरी वस्तीत पाणी शिरू लागले आहे.

माण तालुक्यातील सर्वात मोठे आंधळी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. बांधल्यापासून ते 11 वेळा ओव्हरफ्लो झाले. मे महिन्यात प्रथमच ते तुडुंब झाले आहे. सातारा शहरात मात्र पावसाने उसंत घेतली असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement

रविवारी सकाळपासूनच सातारा शहरात पावसाने थोडी उसंत दिल्याने पावसाळी खरेदीला जोर बाजारपेठेत आला होता. तर पडझडीच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. जिह्यात 25 रोजीच्या अहवालात तब्बल 11 घरांची अशंत: पडझड झाली आहे. तर दोन विहिरी खचल्या आहेत. अद्यापही पाच रस्ते वाहतुकीकरता बंद झालेले आहेत. फलटण तालुक्यात 163.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर मंदावल्याने पावसाळी पर्यटन वाढले आहे.

  • फलटण, माण तालुक्यातील परिस्थिती बनली बिकट

मुसळधार मान्सूनपूर्व पावसाने फलटण तालुक्यातील परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. दुष्काळी भागातील बाणगंगा धरण तुडुंब भरल्यामुळे धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे बाणगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे फलटण तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच माणगंगेला पूर आल्यामुळे म्हसवडमध्ये नागरी वस्तीत पाणी शिरू लागले आहे. बाजारपटांगणावर पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यातील सर्वात मोठे आंधळी धरणही फुल्ल भरले आहे. त्याच्या सांडव्यावरुन पाणी सुरू आहे. वडजल, नरवणे, काळेवाडी, कुकुडवाड, बोरगेवाडी, वळई, गोंदवले परिसरातही जोरदार पाऊस झाला. नरवणे रोडवर वाहणाऱ्या पाण्यामुळे तब्बल 70 गावांचा संपर्क तुटला होता.

गेल्या आठवडाभर जिह्यात चौखुर असा पाऊस पडत आहे. अगदी दुष्काळी माण, खटावमध्येही ओढे, नाले भरुन वाहू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. अतिपावसाच्या तालुक्यामध्ये पावसाचा जोर होता. शनिवारी पावसाचा जोर मंदावला गेला असून रविवारीही सातारा शहर व परिसरात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठेत पावसाळी खरेदी करण्यासाठी सातारकर बाहेर पडल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, सुरु असलेल्या पावसामुळे पडझडीच्या आकडेवारीत वाढ होत आहे. जिह्यात दि. 25 च्या अहवालात जिह्यात 234.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सहा मंडलात जास्त पाऊस झाला असून 11 घरांची अशंत: पडझड झाली आहे. तर अद्यापही 5 रस्ते वाहतुकीकरता बंद ठेवले गेले आहेत. दोन विहिरी खचल्या आहेत. फलटण तालुक्यातील फलटण शहरात 163.5 मिलीमीटर सर्वात जास्त नेंद झाली आहे. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील आसू 77 मिलीमीटर, वाठार 135.3 मिलीमीटर, बरड 98.8 मिलीमीटर, राजाळे 104.8 मिलीमीटर, कोळकी 102.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर तालुकानिहाय झालेल्या पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये सातारा 16.9, जावली 12.1, पाटण 22.2, कराड 21.9, कोरेगाव 43.0, खटाव 33.5, माण 33.6, फलटण 85.3, खंडाळा 34.9, वाई 19.9, महाबळेश्वर 16.0, अशी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने पावसाळी पर्यटन करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. कास, ठोसेघरसह परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर रविवारी जाताना दिसत होते. अशा ठिकाणी हुल्लडबाजी करणारे तरुण झिंगाट होवून धिंगाणा करताना दिसत होते. त्यांच्यावर सातारा पोलीस कारवाई करताना पहायला मिळत होते.

  • मांढरदेव घाटात दरडी कोसळल्या

मांढरदेव (ता. वाई) परिसरामध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. यामुळे वाई ते मांढरदेव रस्त्यावरील घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. यामुळे वाहनचालकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दरडी कोसळल्यानंतर बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवून रस्ता मोकळा केला.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले तीर्थक्षेत्र मांढरदेवला येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. त्यामुळे वाई ते मांढरदेव रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, दोन वर्षे होवूनही हे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. या दोन्ही घाटांचे काम करत असताना रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणावरील डोंगर भाग तोडण्यात आलेला आहे. मात्र, काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने डोंगर फोडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली.

काम करत असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराकडून दरड न कोसळण्याची कोणतीच दक्षता घेतलेली नाही. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मांढरदेव घाटात दरडी कोसळू लागल्या आहे. शुक्रवारी घाटात दरड कोसळली. या घटनेत कोणतीही वित्तहानी झाली नाही. घटनेनंतर बांधकाम विभागाने कोसळलेली दरड तातडीने हटवली.

..

Advertisement
Tags :

.