राजस्थानमध्ये पुन्हा पावसाचा कहर
अनेक राज्यांमध्ये आयएमडीकडून अलर्ट जारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशाच्या विविध भागात मान्सूनचा पाऊस सुरूच आहे. राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात बुधवारपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. गुरुवारी देशातील इतर अनेक राज्यांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, हा पुढील दोन-तीन दिवस पावसाचे हे सत्र सुरूच राहणार आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशातील अनेक जिह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचदरम्यान राजस्थान आणि मध्य प्रदेशातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमध्ये गुरुवारी हलका ते मध्यम पाऊस सुरू होता. मात्र, नजिकच्या काळात हा जोर वाढणार आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरच्या बहुतेक भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. उत्तर प्रदेशच्या अनेक भागातही मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. उत्तर प्रदेशातील बरेली, बांदा, हरदोई, कानपूर, अलिगड, चित्रकूट, उन्नाव, कन्नौज, कानपूर देहात, फतेहपूर आणि बिजनोर येथेही पावसाचा जोर वाढला होता. बिहारच्या बहुतेक भागात शुक्रवारी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्टपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 2 ते 5 ऑगस्ट दरम्यान उत्तर आणि तराई भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.