For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाऊस तूट भरून काढणार

06:35 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाऊस तूट भरून काढणार
Advertisement

पुढील महिनाभर दमदार पावसाची शक्यता, मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय

Advertisement

पुणे / प्रतिनिधी

देशात तसेच राज्यात मान्सूनचा पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील चार आठवडे दमदार पावसाची शक्मयता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यातही जूनच्या शेवटच्या टप्प्यात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने या महिन्यातील पावसाची तूट भरून निघण्याची शक्मयता आहे.

Advertisement

मान्सूनची पूर्व तसेच पश्चिम शाखा सक्रिय झाली असून, पाऊस पुन्हा परतला आहे. मान्सूनने सध्या देशाचा निम्म्याहून अधिक भाग व्यापला आहे. उत्तरेकडील उष्णतेची लाटही ओसरली आहे. लवकरच दोन्ही शाखा पुढे सरकणार आहेत. साधरण 15 जुलैपर्यंत मान्सून देश व्यापतो.

अरबी समुद्रातून पश्चिमी वारे मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येत आहेत, तर बंगालच्या उपसागरातही पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम किनारपट्टीवर हवेचा ट्रफ निर्माण झाल्याने कोकण, गोवा, कर्नाटक, केरळमध्ये पुढील 2 दिवस  मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 चार आठवडे पाऊस

20 ते 27 जूनमधील आठवड्यात पाऊस वेग धरेल. त्यानंतरच्या 27 जून ते 4 जुलैदरम्यान पावसाची तीव्रता अधिक असेल. त्यानंतचे पुढील 2 आठवडे देशात सर्व दूर पाऊस राहील.

देशभरात जून महिन्यात उणे 17 टक्के पाऊस

देशात 1 ते 20 जून या कालावधीत उणे 17 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे, तर राज्यात उणे 3 टक्के इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे.

 मान्सून पुढे सरकला

दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकले असून, संपूर्ण विदर्भ, छत्तीसगड, ओरिसा, बिहारचा काही भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, ओरिसाचा बहुतांश भाग त्याने व्यापला आहे. मान्सून पुढे जाण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दुसरीकडे राज्याचा 95 टक्के भाग मान्सूनने व्यापला असून, आता केवळ उत्तर महाराष्ट्रातील काही भाग राहिला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून राज्य व्यापण्याचा अंदाज आहे.

 महाराष्ट्र किनारपट्टी, गोवा, कर्नाटकात रेड अलर्ट

कर्नाटक ते केरळदरम्यान पसरलेल्या ट्रफची तीव्रता वाढली असून, याच्या प्रभावामुळे 23 जूनला महाराष्ट्र किनारपट्टी, गोवा, कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण कर्नाटक केरळमध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. याबरोबरच या भागात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.