Sangli Rain Update : कोयना, वारणेतून विसर्ग बंद, कृष्णेची पाणीपातळी वाढली
खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या आहेत
सांगली : सांगली जिल्ह्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कायम असल्याने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. अनेक भागात ओढ्या नाल्यासह शिवारात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या आहेत. तर नद्यांच्या पात्रात पाणीपातळी वाढल्याने कोयना आणि वारणा धरणातील विसर्ग बंद करण्यात आले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. मान्सून केरळमध्ये दाखल होण्यापूर्वीच मान्सूनप्रमाणे पाऊस सुरू झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे.
साताऱ्यासह सांगलीत जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी 11 फुटावर गेली आहे. कोयना धरणात सध्या 24.66 टीएमसी पाणी साठा असून 23.43 टक्के धरण भरले आहे. शनिवारी दुपारी कोयना धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर सायंकाळी वारणा धरणातील विसर्गही बंद करण्यात आला आहे.
दुष्काळी भागासह पश्चिम भागातील काही मंडलामध्येही अतिवृष्टीही नोंद झाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. मिरज तालुक्यातील कवठेपिरान मंडलामध्ये अवघ्या सहा सात दिवसांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
याशिवाय आरग, मिरज, कसबे डिगज, कवलापूर,बेडग, बेळंकी, कुपवाड, संख, माडग्याळ, विटा, खानापूर, करंजे, भाळवणी, वाळवा, कोरेगाव, कुरळप, तांदूळवाडी, पेठ,आष्टा, चिकुर्डे, कामेरी, इस्लामपूर, तासगाव, सावळज, कोकरूड, शिराळा, मांगले, दिघंची, खरसुंडी, ढालगाव, देशिंग, कुची, हिंगणगाव, वांगी, नेवरी, चिंचणी, कडेगाव, शाळगाव या मंडलामध्ये अवघ्या सहा ते सात दिवसांत शंभर ते पावणेदोनशे मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारीही जिल्ह्यातील अनेक भागात तुरळक ते मुसळधार पाऊस झाला आहे.