शहरासह परिसरात परतीच्या पावसाची हजेरी
बाजारपेठेत व्यापाऱ्यांबरोबर ग्राहकांचीही उडाली तारांबळ
बेळगाव : परतीच्या पावसाने शहर परिसर आणि तालुक्याला बुधवारी सायंकाळनंतर अक्षरश: झोडपून काढले. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेषकरून भाजी विक्रेत्यांची पंचाईत झाली तर कांदा मार्केटमध्ये पावसाचे पाणी तुंबले. त्यातच थांबून भाजी विक्रेत्यांना व्यापार करावा लागला. पावसाच्या हजेरीमुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. भात पोसवणीला सुरुवात झाली असून हा पाऊस बळीराजाला दिलासा देणारा ठरला आहे. चांगल्या पद्धतीने भात पोसवणी व्हायची असल्यास हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. बुधवारी दुपारीदेखील पावसाने हजेरी लावली.
त्यानंतर सायंकाळी 6.30 च्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांतच सर्वत्र पाणीच पाणी झाले. गणपत गल्ली, मारुती गल्ली त्याचबरोबर कांदा मार्केटमध्ये पाणी शिरल्याने बैठे विक्रेते व फेरीवाल्यांची तारांबळ उडाली. पाऊस येणार नाही असे वाटून सकाळी बाहेर पडलेल्या नागरिकांना रेनकोटअभावी घरी भिजून जाण्याची वेळ आली. दिवाळी उंबरठ्यावर असल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. बुधवारी सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांबरोबर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. काहीवेळातच बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ थंडावली. जवळजवळ दोन तास पावसाचा जोर होता. बुधवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. सायंकाळी पावसामुळे हवेत गारवा पसरला होता.