न्यूझीलंड - श्रीलंका लढतीवर पावसाचे सावट
वृत्तसंस्था/ बेंगळूर
न्यूझीलंड संघाची विश्वचषकातील मोहीम सुरुवातीच्या वर्चस्वानंतर त्यांच्यासाठी निराशाजनक राहिली आहे आणि आज गुरुवारी येथे स्पर्धेतील आव्हान संपलेल्या श्रीलंकेचा ते सामना करणार आहेत. किवींनी पुन्हा उसळी घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या गोलंदाजीने चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. या सामन्यावर पावसाचे सावट पसरलेले असून सध्या न्यूझीलंडचे आठ गुण झाले आहेत. आज पराभव स्वीकारावा लागला किंवा सामना पावसामुळे झाला नाही, तर आपण स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ शकतो याची न्यूझीलंडला जाणीव आहे.
न्यूझीलंड गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान (0.036) आणि अफगाणिस्तान (उणे 0.338) यांचेही प्रत्येकी आठ गुण आहेत आणि ते देखील त्यांच्या संबंधित अंतिम लीग सामन्यात अनुक्रमे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून 10 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे किवींना (0.398) धावसरासरीची देखील काळजी घेऊन पुरेसा मोठा विजय मिळवावा लागेल. न्यूझीलंडसाठी ही फारशी आशादायी परिस्थिती नाही, परंतु आज विजय मिळविल्यास ते कमीत कमी उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहतील.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना वगळता न्यूझीलंडची फलंदाजी कोलमडली नाही, परंतु त्यांच्या गोलंदाजीला गरजेच्या वेळी धार दाखविता आलेली नाही. या मैदानावर किवींनी पाकिस्तानविऊद्ध 400 धावा केल्या, परंतु त्यांच्या गोलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही आणि ट्रेंट बोल्ट, टिम साउदीसारख्या अनुभवी गोलंदाजांचाही त्यात समावेश राहिला. डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरची कामगिरी दिलासादायक राहिलेली असली, तरी ग्लेन फिलिप्सच्या ऑफस्पिनवर अवलंबून राहण्याचे धोके पाकिस्तानच्या फलंदाजांनी त्याच्यावर हल्ला चढविल्याने स्पष्ट झाले आहेत. न्यूझीलंडचे गोलंदाज विशेषत: मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दबाव आणू शकलेले नाहीत आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हा विभाग सुधारण्यास त्यांचे प्राधान्य असेल. श्रीलंकेकडे कदाचित पाकिस्तानसारखे फलंदाज नसले, तरी त्यांच्याकडे पथुम निसांका आणि सदीरा समरविक्रमासारखे फलंदाज आहेत.
न्यूझीलंडसमोर दुखापतींच्या समस्यांमुळे भरपूर अडथळे निर्माण झालेले आहेत. कर्णधार केन विल्यमसन, जेम्स नीशम, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यासारख्या अनेक महत्त्वाच्या खेळाडूंची सेवा सतत न मिळाल्याने त्यांना जोरदार फटका बसलेला असून ते चार सामने हरलेले आहेत. रचिन रवींद्रने मात्र प्रभाव पाडलेला असून फिलिप्स अनेकदा विध्वंसक ठरलेला आहे. त्यांच्यासह संघाला विल्यमसनकडूनही अपेक्षा असतील. सलामीच्या सामन्यात इंग्लंडविऊद्ध शतक केल्यानंतर डेव्हॉन कॉनवेला मात्र सूर सापडलेला नाही. दुसरीकडे, श्रीलंकेची वाटचालही अनेक प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे कठीण झालेली आहे. त्यांच्याइतके बदल कदाचित अन्य कोणत्याही संघाला करावे लागलेले नाहीत.
संघ-न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग.
श्रीलंका : कुसल मेंडिस (कर्णधार), कुसल पेरेरा, पाथुम निसांका, दुष्मंथा चमीरा, दिमुथ कऊणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डिसिल्वा, महीश थीक्षाना, दुनिथ वेललागे, कसुन रजिथा, आंजेलो मॅथ्यूज, दिलशान मदुशंका, दुषन हेमंथा, चमिका करुणारत्ने.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.