For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोमवारीही पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले

11:53 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोमवारीही पावसाने शहरासह ग्रामीण भागाला झोडपले
Advertisement

बेळगाव : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे. सकाळ व संध्याकाळच्या सत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. दुपारीही अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे त्याचा त्रास बाजारपेठेतील फेरीवाले, भाजीविक्रेते व खरेदीदारांना सहन करावा लागत आहे. या पावसामुळे नव्याने भातलावणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसण्याची भीती आहे. यावर्षी मान्सूनचे जोरदार आगमन झाले. जुलै महिन्यामध्येच मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने नदी, नाले, जलाशये तुडुंब भरली होती. नदी-नाले परिसरातील शिवाराला पूर आला होता. त्यामुळे भातपिके कुजून गेली होती. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली. आठ दिवस उन्हही पडले. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांनी भातलावणी केली. मात्र आता त्यामध्ये पुन्हा पाणी साचल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सध्या जोरदार पाऊस पडल्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शिवारातही मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी फटका बसला.

Advertisement

सोमवारी सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळत होता. श्रावण सोमवार असल्यामुळे भाविक महादेव व इतर मंदिरांसमोर दर्शनासाठी गर्दी करत होते. मात्र पावसामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. भरपावसातही कपिलेश्वर मंदिरासमोर दर्शनासाठी गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. गोकुळाष्टमी असल्यामुळे साऱ्यांची बाजारात खरेदीसाठी गर्दी होती. तसेच लगबगही दिसून येत होती. यावर्षी झालेल्या मान्सूनच्या जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खडी उखडून पडली आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे हे खड्डे बुजविणे गरजेचे आहे. पण पाऊस थांबला नाही तर खड्डे बुजविणेही अवघड जाणार आहे. श्रावण सोमवारमुळे बाजारपेठेत गर्दी होत असते. पण पावसामुळे गर्दी काहीशी कमी दिसत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.