For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्याला गुरुवारीही पावसाने झोडपले

10:16 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्याला गुरुवारीही पावसाने झोडपले
Advertisement

शेतवाडीत पाणीच पाणी झाल्याने पेरणी कामे खोळंबली : सध्या पावसाच्या विश्रांतीची गरज

Advertisement

खानापूर : शहरासह तालुक्याला गुरुवारीही दुपारी पावसाने झोडपल्याने बाजारपेठेतील लोकांची तारांबळ उडाली. दुपारी तीन वाजता जोरदार सुरू झालेल्या पावसाची सायंकाळपर्यंत रिपरिप सुरुच होती. गेले दोन दिवस झालेल्या पावसाने  शेतवडीत पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी हंगामात अडथळा निर्माण झाल्या असून शेतकऱ्यांनी भात पेरण्या थांबवल्या आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या वळिवाच्या पावसाने पेरणीपूर्व मशागती कामे करून घेतली होती. काही शेतकऱ्यांनी पेरण्याही पूर्ण केल्या होत्या. उर्वरित शेती मशागतीची कामे व पेरणीत शेतकरी गुंतला होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे  आपल्या पेरण्या थांबवल्या आहेत.

...तर लागवडीशिवाय पर्याय नाही

Advertisement

पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसाने तालुक्यात खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीची कामे हाती घेण्यात आली होती. सध्या पावसाने अशीच सुरवात ठेवल्यास शेतकऱ्यांना पुढील कामे करणे कठीण होणार असून, रोप लागवडीचा (नट्टीचा) पर्याय स्वीकारावा लागणार आहे. यावर्षी आतापर्यंत पावसाने शेतकऱ्यांना चांगला हंगाम दिल्याने शेतकरी आनंदीत आहे.

पावसाच्या उघडिपीची गरज

मागीलवर्षी सुरवातीला पावसाने अशीच साथ दिली होती. मात्र जूननंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला होता. यावर्षी वळिवाची हजेरी उशिराच लागल्याने शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मशागतीना कामाना थोडासाच वेळ मिळाला होता. सध्या 25 ते 30 टक्के पेरणी शिल्लक आहे. त्यामुळे पावसाने उसंत घेणे गरजेचे आहे. जर पावसाने पुढील चार-पाच दिवस विश्रांती घेतल्यास शेतकऱ्यांना चांगला हंगाम मिळणार असून, उर्वरित कामे करण्यास सुलभ होणार आहे.

Advertisement
Tags :

.