राजधानी पणजीला पावसाने झोडपले
अवघ्या दीड तासात तीन इंच पाऊस : अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली,ठिकठिकाणी नरकासूर प्रतिमांचे नुकसान
पणजी : रविवारच्या पावसानंतर सोमवारी सायंकाळी उशिरा उत्तर गोव्यातील विविध भागात पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पणजीमध्ये मुसळधार पाऊस सायंकाळी उशिरा पडला. अवघ्या तासाभरात पणजीचे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. पणजीत दीड तासात पावणेतीन इंच पावसाचा विक्रम झाला. या पावसाचा व त्याचबरोबर आलेल्या वाऱ्याचा वेगही बराच मोठा होता. गेले दहा दिवस कष्ट करून उभारलेल्या अनेक नरकासूर प्रतिमांनी मान आडवी टाकली. पणजीत सायंकाळी काही वृक्ष उन्मळून पडले. दि. 1 नोव्हेंबरपर्यंत दररोज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करून हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
यंदाच्या दिवाळीत पावसाचा धुमाकूळ असणार असे केलेले भाकित खरे ठरले आहे. हवामान खात्याने सोमवारी दुपारी पुढील चार दिवसांच्या पावसाचा अंदाज वर्तविला असून या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रविवारी गोव्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडला. सोमवारी पहाटे सर्वत्र धुके पसरले होते. सोमवारी दुपारी उकाड्याने नागरिक हैराण झालेले होते. तर सायंकाळी उशिरा म्हणजेच 7 वा. च्या दरम्यान पणजीत अवघा तास दीड तास परंतु मुसळधार पाऊस पडला. आतापर्यंतचा यंदाचा विक्रम प्रस्थापित केला. पणजी शहरात तब्बल दीड तासात जवळपास 3 इंच एवढा विक्रमी पाऊस पडला. ढगफुटीसदृश असाच हा पाऊस होता.
पणजीत अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. अनेकांच्या घरात पाणी आले. कारण पाऊस नेहमी पडतो तसा सरळ नव्हता तर आडवा तिडवा अशा पद्धतीनेच तो मुसळधार कोसळला. विजांच्या चकमकाटासह आणि गडगडाटही चालू होता. पावसाचे एवढे प्रमाण कैक वर्षानंतर पणजीकरांनी अनुभवले. वाऱ्याचाही जोरदार वेग त्यामुळे दिवाळीनिमित्त नरकासूर प्रतिमा उभारणीचे गेले आठ ते दहा दिवस रात्रीच्यावेळी जे काम चालू होते ते सारे वाया गेले. अनेक ठिकाणी नरकासूर प्रतिमा कोसळल्या. अनेक विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेले आकाशकंदील भिजून गेल्याने त्यांचेही नुकसान झाले.
शहरातील रस्ते पाण्याखाली
अवघ्या तासा-दीड तासात पावणेतीन इंचपेक्षाही जादा पाऊस कोसळल्याने रात्रीच्यावेळी पणजीत किती नुकसान झाले याचा अंदाज काही लागला नाही. परंतु पणजीतील 18 जून रस्तासहीत अनेक रस्ते पाण्याखाली गेले. वाहनचालकांचे अक्षरश: हाल झाले. अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने दुकानदारांचेही नुकसान झाले. कित्येक ठिकाणी वृक्ष कोसळल्याचेही वृत्त आहे. पुढील चार दिवस गोव्यात सर्वत्र पाऊस थैमान घालण्याची शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार रविवारप्रमाणेच सोमवारी पावसाने साखळीला झोडपून काढले. तिथेही अनेक रस्ते पाण्याखाली गेले. आमोणे, माशेल, कुंभारजुवे, जुने गोवे, फोंडा तसेच सत्तरीतील काही भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले.