For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिसऱ्या दिवशी पावसाचा लपंडाव

06:58 AM Dec 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिसऱ्या दिवशी पावसाचा लपंडाव
Advertisement

 टीम इंडियाच्या 4 बाद 51 धावा : जैस्वाल, विराट, गिल, पंत पुन्हा फेल : कांगारुंच्या पहिल्या डावात 445 धावा

Advertisement

वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या दिवशी (सोमवारी) पावसाचा लपंडाव पाहिला मिळाला. पावसामुळे जवळपास दोन सत्रांचा खेळ खराब झाला. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने 445 धावा केल्या. यानंतर टीम इंडियाने प्रत्युत्तरात 4 विकेट गमावून 51 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या 394 धावांनी मागे आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने सामन्याच्या उर्वरित दोन्ही दिवशी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय तितकासा योग्य ठरला नाही. पावसामुळे पहिल्या दिवशी फारसा खेळ होऊ शकला नाही. मात्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले. ट्रेव्हिस हेड व स्टिव्ह स्मिथ या दोघांनी बुमराह वगळता भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई करताना शानदार शतके झळकावली. दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात बुमराहने या दोघांना बाद करत टीम इंडियाला यश मिळवून दिले.

7 बाद 405 धावसंख्येवरुन कांगारुंनी तिसऱ्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात केली. पण अवघ्या 40 धावांची भर घातल्यानंतर कांगारुंचा पहिला डाव 445 धावांत आटोपला. मिचेल स्टार्कला (18) जसप्रीत बुमराहने यष्टिरक्षक पंतच्या हाती बाद केले. यानंतर नॅथन लियॉन (2) सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर अॅलेक्स कॅरीला आकाश दीपने बाद केले. कॅरीने 88 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 70 धावा केल्या. कॅरी बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 445 धावांत आटोपला. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या.

भारतीय फलंदाज पुन्हा फेल

ऑस्ट्रेलियाचा डाव 445 धावांत संपल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर भारताचा डाव सुरु झाला आणि दुसऱ्या चेंडूवरच भारताने यशस्वी जैस्वालची (4) विकेट गमावली. यानंतर शुभमन गिलही (1) डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला आणि या दोन्ही विकेट मिचेल स्टार्कने घेतल्या. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीही (3) आऊट झाला. कोहलीची विकेट पडताच पुन्हा एकदा पाऊस परतला आणि त्यानंतर पंचांनी लंचची घोषणा केली.

उपाहारानंतर सामना सुरु झाला आणि केवळ सात चेंडू टाकल्यावर पाऊस आला. 40 मिनिटांच्या विश्रांतीनंतर 3.5 षटकांच्या गोलंदाजीनंतर पुन्हा पावसाने सुरुवात केली. सामना सुरु होताच चौथ्या चेंडूवर ऋषभ पंतने आपली विकेट गमावली. पंतला केवळ 9 धावा करता आल्या. यानंतर सातत्याने पाऊस येत राहिल्याने पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द केला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 17 षटकांत 4 गडी गमावत 51 धावा केल्या आहेत. केएल राहुल 33 तर रोहित शर्मा 0 धावांवर नाबाद परतले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया पहिला डाव सर्वबाद 445

भारत 17 षटकांत 4 बाद 51 (जैस्वाल 4, गिल 1, विराट कोहली 3, पंत 9, केएल राहुल नाबाद 33, रोहित नाबाद 0, मिचेल स्टार्क 2 बळी तर कमिन्स व हेजलवूड प्रत्येकी 1 बळी).

चौथ्या दिवशी पावसाचा व्यत्यय राहणार

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा कहर पहायला मिळाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या दिवशी पावसाची जवळपास 100 टक्के शक्यता आहे.  दिवसभरात ताशी 15 किमी वेगाने वारेही वाहू शकतात.

ऑस्ट्रेलियात बुमराहचे बळींचे अर्धशतक

गाबा येथील तिसऱ्या कसोटीत बुमराहने मिचेल स्टार्कची विकेट घेत ऑस्ट्रेलियात 50 बळी पूर्ण केले. भारतासाठी अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात बुमराहच्या आधी फक्त एकच भारतीय गोलंदाज 50 बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे. हा गोलंदाज म्हणजे महान क्रिकेटपटू कपिल देव. कपिल देव यांनी आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सर्वाधिक 51 विकेट घेतल्या होत्या. बुमराह आता कपिल देवचा हा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे.

ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज

  1. कपिल देव - 51
  2. जसप्रीत बुमराह - 50
  3. अनिल कुंबळे - 49

4. आर अश्विन - 40.

Advertisement
Tags :

.