देखाव्यांना पावसाचे विघ्न !
सातारा :
दरवर्षी सातारा शहरात राजधानी साताऱ्यात गणेशोत्सवाला देखावे पहाण्यासाठी धामधुम सुरु असते. परंतु यावर्षी पावसामुळे देखावे करण्यासाठी मंडळांनीच निरुत्साह दाखवला असून मोजक्याच मंडळांकडून जिवंत देखावे दाखवले जात आहेत. त्यामध्ये शनिवार पेठेतल्या बालविकास मंडळाचा स्वामी समर्थांचा प्रकट दिन, सोन्या मारुती मंडळाचा कलाकार टिकला पाहिजे, गजराज गणेश मंडळ सोमवार पेठेच्या मंडळाचे कोडांजी फर्जंदचा देखावा तर मारवाडी भूवन गणेश मंडळानेही ऐतिहासिक असा देखावा साकारला असून फुटका तलाव गणेशोत्सव मंडळाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचा देखावा पाहण्यासाठी अक्षरशः रिघ लागली आहे.
देखावे पाहण्यासाठी मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सातारा शहरात यावर्षी पावसामुळे गणेशोत्सव मंडळांनी देखाव्याऐवजी आकर्षक गणेशमूर्तीवर भर दिला आहे. परंतु काही मंडळांकडून आपली परंपरा खंडित करायची नाही. पावसाचे विघ्न असले तरीही त्यांनी जिवंत देखावे साकारले आहेत. त्यामध्ये फुटका तलाव या गणेशोत्सव मंडळाने आपल्या मंडळाचा गणपती हा तळ्यात बसवला असून तो लक्ष वेधून घेत आहे. तळ्याच्याच बाजूला ऑपरेशन सिंदूर दाखवले गेले आहे. भले मोठे विमान करण्यात आलेले असून ऑपरेशन सिंदूर कसे राबवले, त्याची माहिती साकारण्यात आली आहे. तेथेच लागून पुढे चकोर बेकरीच्यासमोर सोमवार पेठेतील गजराज गणेशोत्सव मंडळ आहे. त्या मंडळाचे अध्यक्ष गजानन माने यांच्या संकल्पनेतून कोंडाजी फर्जंद या मावळ्याने केलेल्या पराक्रमाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. कलाकारांच्या सादरीकरणामुळे तेथून देखावा पाहण्यासाठी आलेले खिळून राहात आहेत. तसेच सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष पांडूरंग पवार यांनी सामाजिक संदेश देण्याचा देखावा साकारला असून कलाकारांना विसरु नका, व्यथा कलाकारांच्या सांगण्याचा प्रयत्न देखाव्याच्या माध्यमातून केला आहे. तेथेच शेजारी शनिवार पेठेत बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष विश्रांत कदम आणि उपाध्यक्ष सागर पावशे आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वामी समर्थ यांचा प्रकट दिनाचा देखावा साकारला आहे. लाकूड तोड्या जंगलात जातो. तेथे त्यांच्या समक्षच स्वामी वारुळातून प्रकट होतात, असा हा देखावा आहे. त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे शनि मंदिरासमोरील जय जवान गणेशोत्सव मंडळाने जलमंदिर पॅलेसची प्रतिकृती साकारली गेली आहे. त्याचबरोबर मारवाडी भूवन गणेशोत्सव मंडळाचा ऐतिहासिक असा देखावा आहे. तर रविवार पेठेतल्या साईदत्त गणेशात्सव मंडळाकडून भुताची हवेली हा देखावा केला आहे. अन्य मंडळाच्या गणेश मूर्ती आकर्षक अशा आहेत. मंडळांचे देखावे पाहण्यासाठी खुले झाले असून नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.
- साताऱ्यातील देखावे...
बाल विकास गणेशोत्सव मंडळ-स्वामी समर्थ प्रकटले. सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळ-कलाकारांना विसरु नका. फुटका तलाव गणेशोत्सव मंडळ-ऑपरेशन सिंदूर. गजराज गणेशोत्सव मंडळ-कोंडाजी फर्जदचा पराक्रम मारवाडी भूवन गणेशोत्सव मंडळ-ऐतिहासिक देखावा. जयजवान गणेशोत्सव मंडळ-जलमंदिर पॅलेस. साई गणेश सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ-पुराणी हवेली.