लंकेच्या सामन्यात पावसाचा अडथळा
चंडिमलचे नाबाद अर्धशतक, कुहनमन, स्टार्कचे प्रत्येकी 2 बळी
वृत्तसंस्था/गॅले
यजमान लंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा अडथळा आल्याने केवळ 27 षटकांचा खेळ झाला. या कालावधीत लंकेने पहिल्या डावात 5 बाद 136 धावा जमविल्या. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 6 बाद 654 धावांवर घोषित केला होता.
या कसोटीमध्ये बलाढ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 654 धावांचा डोंगर रचून आपली स्थिती अधिक मजबूत केली. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेचा पहिला डाव मात्र गडगडला. गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर लंकेची पहिल्या डावात स्थिती 3 बाद 44 अशी होती. या धावसंख्येवरुन त्यांनी खेळाला पुढे सुरुवात केली आणि उपाहारापर्यंत लंकेने आणखी 2 गडी गमविले. एका बाजुने दिनेश चंडीमलने सावध फलंदाजी करत नाबाद अर्धशतक झळकविले. दरम्यान स्टार्कने कमिंदु मेंडीसला कॅरेकरवी झेलबाद केले. त्याने 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. त्यानंतर कुहेनमनने कर्णधार डिसिल्वाला कॅरेकरवी यष्टीचित केले. त्याने 34 चेंडूत 3 चौकारांसह 22 धावा केल्या. चंडीमलने 91 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी पावसाला प्रारंभ झाल्याने पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला आणि लंकेने 42 षटकात 5 बाद 136 धावा जमविल्या. चंडीमल 9 चौकारांसह 63 तर कुशल मेंडीस 1 षटकारासह 10 धावांवर खेळत आहे. लंकेचा संघ अद्याप 518 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 5 गडी खेळावयाचे आहेत. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे कुहेनमन आणि स्टार्क यांनी प्रत्येकी 2 तर लियॉनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 154 षटकात 6 बाद 654 डाव घोषित, लंका प. डाव 42 षटकात 5 बाद 136 (चंडीमल खेळत आहे 63, कमिंदु मेंडीस 15, डिसिल्वा 22, कुशल मेंडीस खेळत आहे 10, स्टार्क आणि कुहेनमन प्रत्येकी 2 बळी, लियॉन 1-43)