इंग्लंड-पाक सामन्यात पावसाची बॅटिंग
आयसीसी महिला वनडे विश्वचषक : सामना रद्द
वृत्तसंस्था/कोलंबो
येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने चार वेळचे वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडपेक्षा सरस खेळ केला. पण शेवटी पावसामुळे सामना रद्द करावा लागला. दोन्हीं संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. याचा फायदा इंग्लिश संघाला झाला असून ते गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वलस्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे पाक संघाचा उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग जवळपास संपल्यात जमा आहे. कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर बुधवारी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी 31-31 षटकांचा खेळवण्यात आला.
यात इंग्लंडच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट्सच्या मोबदल्यात 133 धावा केल्या. इंग्लंडकडून चार्ली डीनने सर्वाधिक 33 धावा केल्या. पाककडून फातिमा सनाने 4 विकेट घेतल्या. यानंतर पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्याने टार्गेट बदलण्यात आले. डकवर्थ लुईसनुसार, पाकिस्तानी संघाला 113 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुनीबा अली आणि ओमाइमा सोहेल या दोघींनी पाकिस्तानला दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या 6.4 षटकात पाक संघाने एकही विकेट न गमावता 34 धावा केल्या होत्या. गोलंदाजीनंतर फलंदाजीतही पाकिस्तानच्या संघाने चमक दाखवली. पण पाऊस आला अन् खेळ बिघडला.