For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात पावसाचा कहर सुरुच!

10:55 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात पावसाचा कहर सुरुच
Advertisement

नदी-नाल्यांना पूर : बेळगुंदी-सोनोली गावचा संपर्क तुटला : बाळगमट्टी रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने गैरसोय

Advertisement

वार्ताहर /किणये 

तालुक्मयात पावसाचा कहर सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. बऱ्याच गावांमध्ये घरांची पडझड होऊ लागली आहे. या मुसळधार पावसामुळे काही गावातील संपर्क रस्ते बंद झालेले आहेत. पश्चिम भागातील सोनोली-बेळगुंदी नाल्यावर पाणी आले असल्यामुळे गावचा संपर्क तुटला आहे. बाळगमट्टी रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शिवारातील बहुतांश कामे ठप्प झाली आहेत. नदीकाठच्या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने भात व अन्य पिके पाण्याखाली गेली आहेत. याची चिंता बळीराजाला लागून राहिली आहे. संततधार पावसामुळे अनेक मुख्य रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. बेळगुंदी-सोनोली या मुख्य रस्त्यावरील सोनोली गावाजवळील पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे या दोन्ही गावचा संपर्क तुटला आहे. सोनोली गावातील नागरिकांना व वाहनधारकांना बेळगावला ये-जा करण्यासाठी बिजगर्णीमार्गे जावे लागत आहे.

Advertisement

पुलाचे काम सुरू असल्याने पाणी राहिले तुंबून

सोनाली गावाजवळील पुलाचे कामकाज सुरू आहे. त्या बाजूनेच वाहनधारकांना जाण्यासाठी रस्ता केला आहे. मात्र या पुलाजवळ पाणी साचल्याने या ठिकाणाहून वाहतूक करणे जोखमीचे ठरणार आहे. यामुळेच सध्या तरी सोनोली बेळगुंदी गावचा संपर्क तुटला असल्याची माहिती स्थानिक वाहनधारक आणि नागरिकांनी दिली.

पूल वाहून गेल्याने शिवाराकडे जाणे मुश्कील

बाळगमट्टी शिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे आता शिवारामध्ये जायचे कसे याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. या पुलाच्या बाजूलाच बाळाराम शहापूरकर, बबन शहापूरकर तसेच शहापूरकर बंधू व बाळगमट्टी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. पूल वाहून गेला असल्यामुळे नाल्यातून येणारे पाणी थेट शिवारात जात असल्याची माहिती शहापूरकरांनी दिली आहे.

राकसकोप धरणाचे दरवाजे उघडल्याने पाणी पातळीत वाढ

राकसकोप धरणाचे दरवाजे उघडले असल्यामुळे मार्कंडेय नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यळेबैल, बेळगुंदी, सोनोली या भागातून जाणाऱ्या मार्कंडेय नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी थेट शिवारातील पिकामध्ये गेले आहे. भातरोप लागवडही नुकतीच करण्यात आली आहे. मात्र सध्या नदीचे पाणी या पिकांमध्ये गेले असल्यामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे आता पुन्हा भातरोप लागवड करावी लागणार की काय? याची चिंता बळीराजाला लागून राहिली आहे.

पिरनवाडी-मच्छेत घरामध्ये पाणी

पिरनवाडी येथील सिद्धेश्वर गल्ली, माऊती नगरामध्ये पाणीच पाणी झाले आहे. बऱ्याच नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे घरातील पाणी काढण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे. त्याचबरोबर मच्छे गावातील काही गल्ल्यांमधील गटारीमधून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे  घरात पाणी शिरत आहे. सध्या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी झाडाच्या फांद्या व झाडे कोसळून पडली आहेत, तसेच विद्युत ताराही तुटून पडल्यामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होऊ लागला आहे.

Advertisement
Tags :

.