पाऊस आला धावून, रस्ते गेले वाहून!
कोल्हापूर :
महापूर आणि अतिवृष्टीने रस्ते खराब होत असल्याचे कारण देणारी महापालिकेची यंत्रणा पहिल्या पावसात उघडी पडली आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्ग, एकात्मिक विकास प्रकल्प, 100 कोटी प्रकल्पातील काही रस्ते आणि नगरोत्थान योजनेतील हाताच्या बोटावार मोजता येतील, असे रस्ते सोडले तर खड्ड्यातून रस्ता शोधून काढावा लागत आहे. पावसाच्या पहिल्याच टप्प्यात शहरात मागील वर्षभरात केलेले किमान 25 ते 30 कोटी रुपयांचे रस्ते वाहून गेले आहेत. विविध कारणासाठी खोदकाम केलेल्याच्या रस्त्यांची रिस्टोरेशेनचा दर्जा नसल्याने तसेच मुरूमाने पॅचवर्क केल्याने बहुतांश रस्ते डर्टट्रॅक बनले आहेत. शहरातील रस्त्यांची अवस्था पाहून टक्केवारीसोबत संबंधितांनी खडी-डांबरही खाल्ले की काय? असा संतप्त सवाल शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय (असेंब्ली रोड), मध्यवर्ती बस्थानक-स्टेशन रोड, शाहूपुरीतील सर्वच प्रमुख मार्ग, सीपीआर चौक भाऊसिंगजी रोड, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, व्हिनस चौक परिसर, कळंबा-जरगनगर रोड, संभाजीनगर परिसर, दसरा चौक, भाऊसिंगजी रोड, आयटीआय रोड, कसबा बावडा-लाईन बझार आदी मुख्य शहरातील भागासह मध्यवस्तीतील रस्त्यांची वाताहात झाली आहे. अगदी सहा महिन्यात केलेले रस्तेही पहिल्याच पावसात खराब झाले आहेत. रस्त्यात मोठे खड्डे पडल्याने पावसात वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
नवीन रस्ते बांधणी निकृष्ट दर्जाची झाली. तसेच उन्हाळ्dयातील दुरुस्ती वर वर केल्याचा हा परिणाम आहे. विविध कारणांसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम केले होते. त्याची डागडुजी केली नसल्याने पावसाळ्यात हे रस्ते डर्टट्रॅक बनले आहेत. अनेक मार्गावर 1 ते 5 फुटांपर्यंत मोठे खड्डे आहेत. सलगपणे खड्ड्यांची मालिकाच असल्याने वाहनधारक मेटाकुटीला येत आहेत. खड्ड्यातील रस्त्यावरुन प्रवास म्हणजे वाहनासह शरीराचेही नुकसान होत आहे. ठेकेदार, अधिकारी आणि निधी आणणारी यंत्रणांच्या मिलीभगत असल्यानेच शहरातील रस्ते वाहनधारकांची हाडे खिळखिळी करणारे ठरत आहेत.
पावसाळ्dयात रस्ते खराब झाले म्हणून मुरूम टाकला जात आहे, हा मातीयुक्त असल्याने दोन दिवसात धुवून जात आहे. हे रस्तेही डर्टट्रॅक बनत आहेत. उपलब्ध निधीतून केलल्या रस्त्यांच्या दर्जाकडे साफ दूर्लक्ष केले जात असल्याचा अनुभव शहरवासियांना आहे. मुदतीत ठेकेदारांकडून रस्ते देखभालीकडे यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा परिणाम म्हणून शहर खड्ड्यात गेल्याचे वास्तव आहे.
- चौकशी.. मागील पानावरुन पुढे
अशाच प्रकारे 2017 च्या पावसात शहरातील रस्ते वाहून गेले होते. त्यावेळी त्रयस्थ संस्थेमार्फत रस्त्यांची तपासणी करण्यात आली होती. वालचंद कॉलेजने रस्त्यांची तपासणी करुन अहवाल दिला होता. यंदाही अशाच प्रकारे रस्त्यांची तपासणी करुन रस्ते बांधणी अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेची जबाबदारी निश्चिती झाली पाहिजे. पेव्हर व हॉटमिक्स पध्दतीने केलेल्या रस्त्यासाठी एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत डागडूजी करण्याची जबादारी ठेकेदाराची असते. मुदत आहे तोपर्यंतच रस्ते कसेबसे तग धरत होते. किंवा मुदतीत खराब झाल्यास मलमपट्टी केली जाते. मे महिन्यात पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांचे सर्वेक्षण करुन डांबर-खडीचे योग्य मिश्रन घालून रोलींग करुन रस्त्यांची डागडूजी केली गेली नाही. यंदाही मुसळधार पावसाचे कारण पुढे करत यंत्रणेकडून सारवासारव होण्याचीच शक्यता आहे.
- 100 कोटी पाण्यात!
रस्ते बांधणी करतानाच ते नियमानुसार निविदा प्रक्रियेतील अटीप्रमाणे व्हावेत, याची शहानिशा केल्यास रस्ते खड्ड्यात जाण्याचे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. मात्र महापालिकेच्या गलथान कारभारच शहरवासीयांच्या जीवावर आला आहे. रस्ते कामातील मलिदा अगोदरच मिळत असल्याने कामाची सुरूवातीपासूनच दर्जाकडे दुर्लक्ष होते. 100 कोटी खर्चून शहरातील काही रस्त्यांची बांधणीची वाटचालही तशीच सुरू आहे का म्हणण्याची वेळ आली आहे. दर्जा राखला नाही तर मागील रस्ते बांधणीप्रमाणे 100 कोटी रुपये पुढील पावसाळ्यात पाण्यात गेल्याचे पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.
.