महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कानपूर कसोटीत पावसाची बॅटिंग

06:58 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिल्या दिवशी अवघ्या 35 षटकांचा खेळ : दिवसअखेरीस बांगलादेशच्या 3 बाद 107 धावा  

Advertisement

वृत्तसंस्था/ कानपूर

Advertisement

भारत-बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (27 सप्टेंबर) कानपूरमध्ये सुरु झाला. मात्र पहिला दिवस पावसामुळे लवकर संपला. सामन्यावर सकाळपासूनच पावसाचं सावट होते, त्यामुळे दिवसाचा खेळ दुसऱ्या सत्रातच आटपावा लागला. दिवसभरात एकूण 35 षटकांचा खेळ झाला, ज्यात बांगलादेशने 3 बाद 107 धावा केल्या. भारताकडून आकाशदीपने 2  रविचंद्रन अश्विनने एक बळी घेतला. दिवसअखेरीस मोमिनुल हक 40 व मुशफिकुर रहीम 6 धावांवर नाबाद राहिले.

शुक्रवारी कानपूर कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी रात्री देखील पाऊस झाल्यामुळे कव्हर्स काढण्यात आले नव्हते. शुक्रवारी ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला एक तास उशीर झाला. सामनाही सकाळी साडेदहा वाजता सुरू झाला. पहिलं सेशन संपल्यानंतर कव्हर्स मैदानावर आले आणि त्यानंतर दुपारी 1.25 वाजता दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला. मात्र, या सत्रात फारसा खेळ झाला नाही आणि केवळ 9 षटकं टाकली गेली. पहिल्या सेशनमध्ये 26 षटकांचा खेळ झाला होता.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती पाहून नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या काही षटकांमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विकेट मिळाली नाही. यानंतर रोहितने डावाच्या नवव्या षटकात चेंडू आकाशदीपकडे सोपवला, त्यानं येताच संघाला पहिले यश मिळवून दिले. सलामीवीर झाकीर हसनला आकाशदीपने भोपळाही फोडू दिला नाही. झाकीर हसन क्रीजवर आल्यापासून संघर्ष करताना दिसला. झाकीरने एकूण 24 चेंडूंचा सामना केला, मात्र यादरम्यान त्याला खातेही उघडता आले नाही. दुसरा सलामीवीर शादनाम इस्लामही 24 धावा काढून बाद झाला. त्यालाही आकाशदीपने पायचीत केले.

पावसाचा व्यत्यय अन् खेळ थांबवण्याचा निर्णय

पहिल्या सत्रात दोन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार शांतो व मोमिनुल हक यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीने एकेरी-दुहेरी धावांवर भर देत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, अश्विनने 29 व्या षटकांत बांगलादेशचा कर्णधार शांतोला 31 धावांवर बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. यानंतर मोमीनुल हक व मुशफिकुर रहीम यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. डावातील 35 षटके झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. काहीकाळ पाऊस थांबून खेळ सुरु होईल याची वाट पाहण्यात आली परंतू तसे झाले नाही. पावसाचा जोर वाढला ज्यामुळे संपूर्ण मैदान हे कव्हर्स टाकून झाकण्यात आले. त्यानंतर अंपायर्सनी पहिल्या दिवसाचा सामना इथेच थांबण्यात येत असल्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसअखेरीस बांगलादेशने 35 षटकांत 3 बाद 107 धावा केल्या होत्या. मोमीनुल हक 7 चौकारासह 40 तर रहीम 6 धावांवर खेळत होते.

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश पहिला डाव 35 षटकांत 3 बाद 107 (झाकीर हसन 0, शादनाम इस्लाम 24, मोमीनुल हक खेळत आहे 40, शांतो 31, रहीम खेळत आहे 6, आकाशदीप 2 बळी, अश्विन 1 बळी).

अश्विनचा आणखी एक विक्रम

रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळेपेक्षा खूप मागे आहे. पण आता अश्विन हा आशियाई खेळपट्ट्यांवर सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. अश्विनने कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा कर्णधार शांतोला पायचीत केले, ही त्याची आशियातील 420 वी विकेट होती. त्याच्या आधी अनिल कुंबळेने आशियामध्ये एकूण 419 विकेट घेतल्या होत्या. आता आशियामध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत अश्विन केवळ मुथय्या मुरलीधरनच्या मागे आहे. याशिवाय, अश्विनने शांतोला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक एलबीडब्ल्यू विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. त्याने महान ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅकग्राला मागे टाकले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक एलबीडब्ल्यू विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.

आशियात सर्वाधिक कसोटी बळी घेणारे गोलंदाज

612 - मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)

420 - आर अश्विन (भारत)

419 - अनिल कुंबळे (भारत)

354 - रंगना हेराथ (श्रीलंका).

विराटचा जबरा फॅन, 58 किमी सायकलिंग करत गाठले कानपूर

भारतातील क्रिकेटची क्रेझ सर्वांनाच माहित आहे. अवघ्या 15 वर्षांचा कार्तिकेय देखील विराट कोहलीचा खूप मोठा चाहता आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथील रहिवासी असलेल्या कार्तिकेयने कोहलीची एक झलक पाहण्यासाठी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमपर्यंत 58 किमी सायकल चालवली. कार्तिकेयने पहाटे 4 वाजता सायकलवरून प्रवास सुरू केला. तो 11 वाजताच्या सुमारास स्टेडियमवर पोहोचला. तो कोहलीला भेटणार असल्याने पालकांनी त्याच्या निर्णयाला सहमती दर्शवली होती. कार्तिकेय वेळेवर स्टेडियमवर पोहोचला पण पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ बंद करण्यात आला होता. दहावीत शिकणाऱ्या कार्तिकेयचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media#sports
Next Article