सांखळीसह सत्तरीत ढगफुटी सदृश पाऊस
वाळवंटीचे पाणी शिरले दुकाने, घरांमध्ये,अनेक रस्त्यांवरुन वाहल्या जणू नद्या,आजही मुसळधार पावसाची शक्यता
पणजी : सांखळी व सत्तरीमध्ये काल सोमवारी ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस दुपारी 1 वाजल्यापासून सुरू झाला. या पावसाची व्याप्ती सिंधुदुर्गातील काही भाग आणि कर्नाटकातील काही भागात होती. एवढा मुसळधार पाऊस पडला की त्यामुळे वाळपई, होंडा, सांखळी व डिचोली आदी भागात पूर आला. सांखळीत तर रत्यावरून मोठी नदी वहावी अशी परिस्थिती निर्माण झाली. दुपारी 2.50 च्या दरम्यान पणजी वेधशाळेने नारंगी अलर्ट जारी केला. सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने पूर थोडा ओसरला.
आज मंगळवारीही गोव्यात व गोव्याच्या शेजारील भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा ऐन गणेशचतुर्थी उत्सवात पाऊस आक्रमक होण्याचीही शक्यता आहे. अंजुणे धरण क्षेत्रात दुपारी 3 तासांत 3 इंच पावसाची नोंद सोमवारी झाली. सोमवारी गोव्याच्या अनेक भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. हवामान खात्याने कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे म्हटले आहे. मात्र हवामान खात्याने सकाळी 11.30 वाजता यलो अलर्ट जारी केला म्हणजे फार मोठा धोका नाही. परंतु जोरदार पाऊस पडू शकतो, असे म्हटले होते. दुपारी 1 वा. च्या दरम्यान, विर्डी, दोडामार्ग (महाराष्ट्र) तसेच कणकुंबी, चोर्ला, सुरल, भिमगड, खानापूर (कर्नाटक) या गोव्याच्या सीमेवरील भागात तसेच केरी, होंडा, वाळपई, सांखळी, डिचोली, माशेल इत्यादी भागात ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस पडला.
सांखळीच्या वाळवंटी नदीला पूर
सांखळीमध्ये व वाळपईत सकाळपासूनच पावसाची रिपरिप चालू होती. अधूनमधून जोरदार पाऊस पडून जात होता. मात्र दु. 1 वा. पासून 3.30 वा. पर्यंत एवढा मुसळधार पाऊस पडला की जणूकाही ढगफुटीसारखाच तो कोसळत होता. परिणामी सांखळीच्या वाळवंटी नदीला पूर आला. होंडा येथील नदीला आलेल्या पुरामुळे अनेक दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी गेले. वाळपईतदेखील अशीच स्थिती निर्माण झाली. ढगफुटी सदृश असा हा पाऊस अनेक वर्षानुसार या परिसरात पडला.
आठवडी बाजारावर परिणाम
या पावसाचा जोर एवढा मोठा होता की अनेक रस्त्यावरून जणू नद्या वाहतात अशी परिस्थिती दिसत होती. सांखळीमध्ये गोकुळवाडी येथे महामार्गावर मोठी नदी वाहावी अशी स्थिती निर्माण झाली. अनेक गाड्या वाहून जातील, अशी परिस्थिती होती. यासंदर्भातील व्हिडीओ संपूर्ण गोवाभरात पोहोचले. तीन तासांच्या या मुसळधार पावसामुळे केरी, पर्ये व सांखळी या भागात वाळवंटी नदीच्या पुराचे पाणी पसरले. अवघ्या दोन तासांत पुराचे पाणी पात्राबाहेर पोहोचले. वाळवंटीने धोक्याची पातळी ओलांडली. मात्र सायंकाळी पावसाचा जोर थोडा कमी झाला व पूर ओसरला. मात्र या मुसळधार पावसामुळे आठवडी बाजारावर परिणाम झाला.
पणजीत कमी पाऊस
सोमवारी ढगफुटी सदृश पडलेला पाऊस हा डिचोली, सांखळी, होंडा, वाळपई, केरी तसेच शेजारी राज्यातील कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमा भागात पडला. त्या तुलनेत पणजी, म्हापसा, जुने गोवे, आदी किनारी भागात अत्यंत मर्यादित स्वरुपाचा पाऊस होता. हे पावसाळी ढग गेल्या दोन दिवसांपासून पूर्व भागातून येऊन पश्चिम दिशेला सरकत आहे. अशी परिस्थिती पावसाळ्याच्या सुरुवातीला व त्यानंतर परतीच्या पावसावेळी होते. हवामान खात्याने नेमकी काय परिस्थिती होईल याची अचूक माहिती दिली नाही. कदाचित त्यांच्याही ते लक्षात आले नसावे.
अंजुणे धरणातील पाणी पातळी प्रचंडी वाढली
या मुसळधार पावसामुळे अंजुणे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी प्रचंडी वाढली. गेल्या दोन दिवसांपासून वाढता पाऊस लक्षात घेऊन धरणाचे बंद केलेले दरवाजे पुन्हा उघडले आणि केवळ 5 सें. मी. ने दरवाजे खोलले होते. दिवसभरात मुसळधार पावसामुळे सायंकाळी 5 वा. पर्यंत धरण क्षेत्रात 20 से. मी. नी पाण्याची पातळी वाढली. धरणात 93 मीटर पाण्याची पातळी वाढण्यासाठी 30 सें. मी. एवढी पातळी कमी होती. यंदाच्या मोसमात पडलेला पाऊस हा गेल्या कित्येक वर्षांचा रेकॉर्ड बाद करून गेलेला आहे.
अंजुणेत एकूण 220 इंच
काल सोमवारी अंजुणे धरण क्षेत्रात दिवसभरात 4 इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे यंदाच्या मोसमात या धरण क्षेत्रात पडलेल्या पावसाची एकूण नोंद 220 इंच झाली. वाळपईत यंदाच्या मोसमात आतापर्यंत 201 इंच एवढा विक्रमी पाऊस नोंदविला गेला आहे.
राज्यात एकूण 158 इंच पाऊस
गेल्या 24 तासात गोव्यात सरासरी पाऊण इंच पावसाची नोंद झाली. मोसमात पडलेल्या सरासरी पावसाची नोंद 158 इंच झाली आहे. सरासरी पेक्षा 45.6 इंच जादा पाऊस झाला आहे. म्हणजेच यंदाच्या मोसमात 49.50 इंच पाऊस जादा पडला आहे. गोव्यात आतापर्यंत सर्वाधिक 201 इंच पाऊस वाळपईत नोंदविला गेला.
आजही मुसळधार पाऊस
कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदशे, कर्नाटक व महाराष्ट्रावर अद्याप आहे. सायंकाळी पावसाचा जोर गोव्यात कमी झाला असला तरी आज मंगळवारीही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.