‘शक्ती’ योजनेमुळे रेल्वेला फटका
प्रवासी-महसुलावर परिणाम : जवळच्या प्रवासासाठी बसला अधिक पसंती
बेळगाव : राज्यातील पंचहमी योजनांपैकी एक असलेल्या शक्ती योजनेमुळे रेल्वेच्या महसुलाला मोठा फटका बसला आहे. रेल्वे प्रवाशांच्या संख्येवरही परिणाम झाला आहे. परिवहनच्या बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासासाठी शक्ती योजना सुरू झाल्याने नैर्त्रुत्य रेल्वेच्या महसुलावर परिणाम झाला आहे. कर्नाटकातील 84 टक्के रेल्वे नेटवर्क असलेल्या नैर्त्रुत्य रेल्वेच्या प्रवासी महसुलात 2024-25 मध्ये 2.6 इतकी अल्पशी वाढ झाली आहे. परंतु प्रवासी संख्या व मागील दोन वर्षांतील महसुलाचा विचार करता वाढीचा दर घसरल्याचे दिसून येत आहे. शक्ती योजनेमुळे महिलांचा मोफत प्रवास सुरू असल्याने जवळच्या प्रवासासाठी बस प्रवासालाच प्राधान्य देण्यात येत आहे. यामुळे रेल्वे महसुलावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. मोफत बस प्रवासामुळे बस प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
महसूल 10 टक्क्यांनी कमी
शक्ती योजनेमुळे 500 कि. मी. पर्यंतच्या प्रवासाला फटका बसला आहे. याशिवाय आगाऊ बुकिंग कालावधी 120 दिवसावरून 60 दिवसांवर आणल्याने महसूल 10 टक्क्यांनी कमी झाला आहे. याचाही परिणाम महसुलावर दिसून येत आहे. मात्र लांब पल्ल्याच्या प्रवाशांच्या संख्येवर कोणताही परिणाम झालेला नसून त्यात अजून वाढ होत आहे.
- मंजुनाथ कलमडी (जनसंपर्क अधिकारी नैर्त्रुत्य रेल्वे)
