रेल्वे महिला हॉकी संघ विजेता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सोमवारी येथे झालेल्या वरिष्ठ महिलांच्या आंतरविभागीय राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेचे अजिंक्यपद रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाने पटकाविताना अंतिम सामन्यात इंडिय ऑईल संघाचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला.
सदर अंतिम सामना येथील मेजर ध्यानचंद नॅशलन स्टेडियमवर खेळविण्यात आला. या स्पर्धेत देशातील काही अनुभवी आणि नवोदित अव्वल आंतरराष्ट्रीय महिला हॉकीपटूंनी सहभाग दर्शविला हेता. अंतिम सामन्यात 18 व्या मिनिटाला दिपीकाने इंडियन ऑईलचे खाते मैदानी गोलवर उघडले. त्यानंतर 19 व्या मिनीटाला वंदना कटारियाने रेल्वेचा पहिला गोल केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. या सामन्यातील चौथ्या 15 मिनिटांच्या कालावधीत रेल्वेची कर्णधार नवनीत कौरने आपल्या संघाचा दुसरा गोल केला. सामना संपण्यास 5 मिनिटे बाकी असताना सलीमा टेटेने रेल्वेचा तिसरा गोल करुन आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. सलिमा टेटेची या सामन्यात सर्वोत्तम हॉकीपटू म्हणून निवड करण्यात करण्यात आली. या स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सीस (सीबीडीटी) संघाने साईचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा पराभव केला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघ गोल शुन्यबरोबरीत होते.