उत्तराखंडमध्ये चीन सीमेपर्यंत धावणार रेल्वे
169 किमी लांब मार्गावर काम सुरू : काही तासांत सीमेवर सैन्याला रसद पोहोचविणे शक्य
वृत्तसंस्था/ देहरादून
लडाखमध्ये चीनसोबतचा तणाव कमी होत असला तरीही भारताने भविष्यातील तयारीकरता कार्याला वेग दिला आहे. याचनुसार लवकरच उत्तराखंडमध्ये चीन सीमेपर्यंत भारतीय रेल्वे धावताना दिसून येणार आहे. चंपावत जिल्ह्यातील टनकपूरपासून बागेश्वरदरम्यान हा रेल्वेमार्ग निर्माण केला जाणार आहे. हा रेल्वेमार्ग भारतीय सुरक्षा दलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या 169 किलोमीटर लंब रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हा रेल्वे मार्ग उंच हिमालयीन पर्वतांमधून जात चीन सीमेला लागून असलेल्या पिथौरागढ आणि बागेश्वरपर्यंत जाणार आहे. नवा रेल्वेमार्ग रणनीतिक स्वरुपात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण पिथौरागढ जिल्हा नेपाळ आणि चीनसोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागून आहे असे वक्तव्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र सिंह यांनी केले आहे.
टनकपूर हे भारत-नेपाळ सीमेच्या नजीक असून हे उत्तराखंडमध्ये नेपाळ सीमेवरील भारताचे अखेरचे रेल्वेस्थानक आहे. या मार्गावर सर्वेक्षणासोबत स्तंभ उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
सध्या लागतात 16 तास
पिथौरागढ जिल्ह्यातील उंच हिमालयीन भागांमध्ये चीनच्या सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी 5 खिंडी आहेत. यात लम्पिया धुरा, लेविधुरा, लिपुलेख, ऊंटा जयंती आणि दारमा खिंड सामील आहे. या सर्व सुमारे 5 हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर आहेत. याचमुळे सैन्यासाठी या भागांपर्यत जलद रसद पुरवठा करणे अत्यंत आव्हानात्मक असते. टनकपूर येथून पिथौरागढमार्गे चीन सीमेपर्यंत जाण्यासाठी रस्तेमार्गाने 16 तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. नव्या रेल्वेमार्गानंतर हा प्रवास केवळ दोन ते तीन तासांमध्ये पूर्ण होणार आहे. नोएडाच्या स्कायलार्क इंजिनियरिंग डिझाइनिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या टीमने येथे सर्वेक्षण केले आहे.
150 वर्षांपूर्वी रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण
उत्तराखंडच्या या भागाचे सामरिक आणि व्यापारी महत्त्व शतकांपासून राहिले आहे, कारण या सीमावर्ती जिल्ह्यांमधी लोक तिबेटसोबत सीमा व्यापार करत राहिले आहेत. याचमुळे इंग्रजांनी देखील 1882 मध्ये पहिल्यांदा टनकपूर-बागेश्वर रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण केले होते. त्यांच्या सर्वेक्षण नियोजनाच्या मार्ग नकाशावरच नव्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे.
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वेप्रकल्प
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वेमार्ग लवकरच अस्तित्वात येणार आहे. 125 किलोमीटर लांब मार्गावरील 85 किलोमीटरच्या अंतराकरता बोगदे खोदण्याचे काम झाले आहे. रेल्वे विकास महामंडळाचे व्यवस्थापक अजित सिंह यादव यांच्यानुसार 16 किलोमीटर अंतरावरील भुयार खोदण्याचे काम अद्याप व्हायचे आहे. हे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा मार्ग ब्लास्ट लेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्यात आला आहे. या मार्गावर हायस्पीड बुलेट ट्रेनही धावू शकणार आहे. या मार्गावर 13 रेल्वेस्थानकं आणि 16 बोगदे असणार आहेत.