For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वे टेंडर घोटाळाप्रश्नी 23 जुलै रोजी फैसला

07:00 AM May 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
रेल्वे टेंडर घोटाळाप्रश्नी 23 जुलै रोजी फैसला
Advertisement

लालूप्रसाद कुटुंबियांचे भवितव्य ठरणार : तेजस्वी, राबडी देवी आरोपी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

लालूप्रसाद यादव कुटुंबाशी संबंधितरेल्वे टेंडर घोटाळा प्रकरणात निकालाची वेळ आता जवळ आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध या प्रकरणात खटला पुढे जाईल की त्यांना दिलासा मिळेल यावर राऊस अॅव्हेन्यू न्यायालय 23 जुलै 2025 रोजी निकाल देणार आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तपास यंत्रणेने न्यायालयात आपली बाजू मांडली होती. 2004 ते 2014 दरम्यान आयआरसीटीसीमध्ये झालेल्या कथित अनियमिततेशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात लालू यादव आणि इतरांना आरोपी बनवण्यात आले आहे.

Advertisement

दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू कोर्ट 23 जुलै रोजी घोटाळ्यातील आरोपी लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, राबडीदेवी आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करणार आहे. आयआरसीटीसी टेंडर घोटाळा प्रकरणात सीबीआयची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आता लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. अशा परिस्थितीत, 23 जुलै हा दिवस लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. सीबीआयने दाखल केलेल्या रेल्वे टेंडर घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात त्या दिवशी न्यायालयाकडून मोठा निर्णय दिला जाऊ शकतो.

रेल्वे टेंडर घोटाळ्याचे स्वरुप

2006 मध्ये लालूप्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री असताना आयआरसीटीसीने हॉटेल्सच्या संचालन, देखभाल आणि विकासासाठी निविदा जारी केल्या होत्या. ही निविदा प्रक्रिया जाणूनबुजून एका विशिष्ट कंपनीला (सुजाता हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड) फायदा व्हावा यासाठी आखण्यात आली असल्याचा आरोप आहे. या कंपनीच्या मालकीण सरला गुप्ता होत्या. त्या लालू यादव यांचे जवळचे सहकारी आणि तत्कालीन राज्यसभा खासदार प्रेमचंद गुप्ता यांच्या पत्नी आहेत. सीबीआयच्या तपासानुसार, या निविदा प्रक्रियेतील तांत्रिक मूल्यांकनादरम्यान, इतर बोलीदारांना जाणूनबुजून कमी गुण देण्यात आल्यामुळे सुजाता हॉटेल्स एकमेव पात्र बोलीदार ठरली. साहजिकच त्यांना कंत्राट देण्यात आले. या कराराच्या बदल्यात, पाटण्यातील लालू कुटुंबाला जमीन देण्यात आली, असा आरोप आहे. ती बेनामी पद्धतीने हस्तांतरित करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

Advertisement
Tags :

.