एका प्रवाशासाठी रेल्वेस्थानक
कारण कळल्यावर व्हाल आनंदी
जगातील चांगुलपणा संपत चालला आहे असे आजुबाजूचे लोक म्हणत असतात. परंतु जर तुम्ही चहुबाजूला नजर फिरविली तर तुम्हाला सर्वत्र चांगले लोकच दिसून येतील. अशीच एक कहाणी जपानमधील आहे. तेथे सुमारे 9 वर्षांपासून एका प्रवाशासाठी निर्जन स्थानकावर दरदिनी 2 वेळा रेल्वेगाडी थांबत होती. यामागील कारण कळल्यावर तुमचे मन आनंदून जाईल.
जपानच्या होकाइडोमध्ये एक रेल्वेस्थानक होते. याचे नाव क्यू-शिराटाकी स्टेशन होते. अत्यंत छोटे अन् निर्जन स्थानक होते. तरीही दिवसात दोनवेळा येथे एक रेल्वेगाडी थांबत होती. याचे कारण म्हणजे या रेल्वेचा वापर एक 16 वर्षीय मुलगी करत होती. तिला 35 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शाळेत जायचे असायचे. याकरता ती रेल्वेप्रवास करत होती.
मुलीच्या शिक्षणाला फटका बसू नये म्हणून रेल्वेने जोपर्यंत ती शाळेतून पास होत नाही तोवर रेल्वेस्थानक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे तिला दिलासा मिळत राहिला. 25 मार्च 2016 रोजी या मुलीने शाळेतील शिक्षण पूर्ण केल्यावर हे रेल्वेस्थानक सरकारने बंद केले, कारण मुलीला आता रेल्वेतून प्रवास करण्याची गरज नव्हती.
त्यावेळी मुलीचे वय 18 वर्षे होते आणि तिचे नाव काना हराडा होते. रेल्वेस्थानक आता नसेल याचे मला दु:ख आहे, परंतु 3 वर्षांपर्यंत माझ्यासाठी रेल्वेस्थानक सुरू राहिले याचा आनंद होता असे काना हराडाने म्हटले आहे.