रेल्वे प्रवासी महिलेचे दागिने लंपास! बंगळुरू- मुंबई उद्यान एक्सप्रेसमधील
सोलापूर : प्रतिनिधी
बंगळुरू-मुंबई उद्यान एक्सप्रेसने दुधनी ते पुणे प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सुमारे ८० हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्याने लांबवल्याची घटना दुधनी रेल्वेस्थानकाजवळ घडली. याबाबत महिलेने सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ११३०२ बंगळुरू-मुंबई उद्यान एक्सप्रेस ने सकाळी नऊ वाजता इंजिनच्या पाठीमागील जनरल डब्यातून दुधनी ते पुणे असा तझीन मोसिन नदाफ (वय २२, रा. लोहगाव रोड कलवड वस्ती पांडे नगर रोड नंबर ६, पुणे) असे महिलेचे नाव असून त्या दुधनीहून पुणे असा गुरुवारी (ता. २) प्रवास करत होत्या. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुधनी स्थानकादरम्यान जनरल डब्यात जाण्यासाठी गाडीच्या दारात उभ्या होत्या. दरम्यान दाराजवळ प्रवाशांची प्रचंड गर्दी होती हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून सुमारे ८० हजार ५०० रुपयांचे दागिने हात घालून चोरून नेले. यामध्ये सोन्याचे नेकलेस, सोन्याचे कानातील झुमके, अंगठी, गळसरी आणि इतर दागिने होते. महिलेने गुरुवारी (ता. २) नोव्हेंबरला सोलापूर लोहमार्ग येथे येऊन याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार ए. व्ही. पाटील करत आहेत.
चोरी गेलेला मुद्देमाल
चोरीला गेलेल्या पर्समध्ये ३५ हजार रुपयांचे नेकलेस, २० हजार रुपयांचे कानातील झुमके, २२ हजार रुपयांचे सोन्याचे गळसरी, ३ हजार ५०० रुपयांची सोन्याची अंगठी असा ८० हजार ५०० रुपयांचे दागिने होते. या प्रकरणी नदाफ यांनी सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.