बेंगळूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती : बेळगाव, हुबळी, धारवाडला होणार फायदा
बेळगाव : मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली बेंगळूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसला अखेर रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. नुकतीच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून मंजुरी मिळाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे बेळगावहून मुंबई व बेंगळूरसाठी आता आणखी एक सुपरफास्ट एक्सप्रेस मिळणार आहे. मागील 30 वर्षांपासून बेंगळूर-मुंबईला जोडणारी उद्यान एक्सप्रेस सोलापूर-गुंडकल मार्गे धावत होती. परंतु या नव्या एक्सप्रेसद्वारे बेळगाव, हुबळी, धारवाड, हावेरी, दावणगेरी हे जिल्ह्योही जोडले जाणार आहेत. त्यामुळे बेळगावमधून नवी एक्सप्रेस मुंबईसाठी उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसेच ही एक्सप्रेस कर्नाटकासह महाराष्ट्रासाठी कशी महत्त्वाची असेल याची माहिती दिली.