रेल्वेगेट उड्डाणपुलाचे काम अजून दोन दिवस चालणार
खडीकरणानंतर डांबरीकरणाला सुरुवात
बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत डांबरीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी खडी घालण्यात आली असून रोलर फिरविला जात आहे. डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून दोन दिवसांनी हा रस्ता खुला होण्याची चिन्हे आहेत. उड्डाणपुलावर पडलेल्या खाड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली होती. नागरिकांना ये-जा करणेही अवघड होत असल्याने दुरुस्तीसाठी आंदोलने करण्यात आली. नागरिकांनी आंदोलने करताच, तसेच पावसाचा जोर कमी होताच रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम खात्याने उड्डाणपुलावरील रस्ता, तसेच खानापूर रोडवरील ख•dयांच्या दुरुस्तीसाठी 72 लाखांच्या निविदा काढल्या होत्या.
शुक्रवार दि. 7 नोव्हेंबरपासून कामाला सुरुवात झाली. उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवून सर्व भराव काढण्यात आला. उड्डाणपुलावरील पावसाचे पाणी जाण्यास वाट नसल्यामुळे हे पाणी उड्डाणपुलाच्या भरावमध्ये झिरपत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भरावामध्ये ओलावा निर्माण होऊन खड्डे पडत असल्याचा निष्कर्ष व्यक्त करण्यात आला. त्यामुळे पावसाच्या पाण्याचे कंत्राटदाराकडून नियोजन करण्यात आले. सध्या खडी टाकून सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उद्यमबागच्या दिशेनेही खडी टाकून रोलर फिरविण्यात येत आहे. डांबरीकरणाचे काम सुरू झाले असून पुढील दोन दिवसांत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शुक्रवारी अथवा शनिवारी उड्डाणपूल खुला केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
खडीकरणाचे काम पूर्ण
उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम मागील दहा दिवसांपासून सुरू आहे. खडी घालण्याचे काम पूर्ण होत आले असून डांबरीकरण केले जात आहे. चांगल्या दर्जाचे काम होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
- शशिकांत कोळेकर,(साहाय्यक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते)