For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुलींच्या गटात रायगड, नंदुरबारचे शानदार विजय

06:22 AM Oct 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुलींच्या गटात रायगड  नंदुरबारचे शानदार विजय
Advertisement

 नंदुरबारच्या रोहिणी गावितची नाबाद नऊ मिनिटे खेळी

Advertisement

प्रतिनिधी /    धाराशिव

सुवर्ण महोत्सवी 50 वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत मुलींच्या गटात नंदुरबारने छत्रपती संभाजीनगरचा 6-1 असा पाच गुणांनी पराभव केला. महाराष्ट्र खो खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत रोहिणी गावित हिने सलामीचा सायंकाळचा दिवस गाजविला. तिने पहिल्या डावात 8.40 व दुसऱ्या डावात नाबाद नऊ मिनिटे संरक्षण केले. छत्रपती संभाजी नगरच्या दिशा इंगळे हिनेही 2.40 व 7.10 मि. पळती करीत लढत दिली.

Advertisement

अन्य एका सामन्यात रायगडने लातूरला 16-14 असे 2 गुणांनी नमविले. मध्यंतराची सहा पाच ही एका गुणाची आघाडीच रायगडला विजय मिळवून दिली.  संजीवनी जगदाळे हिने 2.30 मिनिटे नाबाद पळती करीत आक्रमणात सहा गडी बाद केले. लातूरच्या पायल माने हिची लढत अपुरी पडली. तिने आपल्या धारदार आक्रमणात सात गडी बाद करीत 1.10 मिनिटे संरक्षण केले. अन्य सर्व सामने एकतर्फी झाले.

मुलांमध्ये सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगरचा पराभव

मुलांच्या गटात धुळ्याने छत्रपती संभाजीनगरला 21-18 असे तीन गुणांनी नमविले.  मध्यंतराची 11-9 ही 3 गुणांची आघाडीच त्यांना विजय मिळवून दिली. त्यांच्या कुणाल शेटे याने दोन, एक व एक मिनिटे नाबाद पळती करत दोन गडी बाद केले. अन्य एका सामन्यात रायगडने सिंधुदुर्ग 17-13 अशी चार गुणांनी मात केली. भावेश गोवलीकर त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पाच गडी बाद करीत एक व 1.20 मिनिटे पळती केली. सिंधुदुर्गच्या अथर्व शिंदे (1.50,1.00 मि. व 4 गुण) याची खेळी अपुरी पडली. अन्य सर्व सामने डावाने झाले.

जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी केले उद्घाटन

या स्पर्धेचे उद्घाटन धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी केले. अध्यक्षस्थानी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे होते. सुरुवातीस ध्वजारोहण आणि त्यानंतर क्रीडा ज्योतीचे आगमन झाले. ती ज्योत प्रमुख पाहुण्यांनी प्रज्वलित केली. त्यानंतर राणी लक्ष्मी आणि जानकी पुरस्कार प्राप्त आश्विनी शिंदे हिने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी द्वापेट कॉलेजचे प्राचार्य डॉ. दयानंद जटमुरे, शि. प्र. मंडळ प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, अर्जुन पुरस्कार विजेते सारिका काळे, खजिनदार ऍड. गोविंद शर्मा, उपाध्यक्ष अश्विनी पाटील, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जे. पी. शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी प्रास्ताविक केले.

उप उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेले संघ व त्यांचे होणारे सामने

कुमार : सोलापूर- बीड, धुळे-अहमदनगर, नाशिक-रत्नागिरी, रायगड-सांगली, धाराशिव- सातारा, नंदुरबार-मुंबई, ठाणे-मुंबई उपनगर, जालना-पुणे.

मुली : धाराशिव-नंदुरबार, अहमदनगर- रत्नागिरी, मुंबई उपनगर-पालघर, धुळे-ठाणे, सांगली-जालना, रायगड-पुणे, सोलापूर-मुंबई, सातारा-नाशिक.

Advertisement
Tags :

.