तोतया डॉक्टरांच्या क्लिनिकवर छापे
प्रतिनिधी/ बेळगाव
अधिकृत पदवी आणि परवाना नसताना त्वचारोग, कुष्ठरोग, सौंदर्योपचार तसेच पशुंवर उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरांच्या क्लिनिकवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी छापे टाकून कारवाई करण्यात आली. यावेळी दहा ब्युटीपार्लर्स आणि क्लिनिकना टाळे ठोकले असून सात ब्युटीपार्लर्सना नोटीस बजावली आहे. शहरामध्ये सौंदर्योपचार करणाऱ्या तसेच त्वचारोगावर उपचार करणाऱ्या क्लिनिकची संख्या वाढली आहे. परंतु त्यांच्याकडे हा उपचार करण्याचा अधिकृत परवाना किंवा वैद्यकीय शाखेची आवश्यक ती पदवी नाही. याबाबत द इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट, व्हेनेरोलॉजिस्ट अँड
रेप्रोलॉजिस्ट कर्नाटक शाखेने हे अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील संघटनेच्या शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी आणि आरोग्याधिकारी यांची भेट घेऊन अनधिकृत ब्युटीपार्लर्स, स्कीन व हेअर क्लिनिक याबद्दल माहिती देण्यात आली होती. याची नोंद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य खात्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली आणि कारवाई करण्याची सूचना केली. या अंतर्गत आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने 30 ब्युटीपार्लर्सवर छापे टाकले. त्यानंतर दहा क्लिनिकला टाळे ठोकले, तर सात क्लिनिकना नोटीस बजावण्यात आली. याशिवाय आरोग्य खात्यातर्फे अशी मोहीम हाती घेण्यात आल्याची कुणकुण लागताच सात क्लिनिकच्या चालकांनी क्लिनिक बंद करून पोबारा केला. तसेच अन्य सहा क्लिनिकमध्ये कोणत्याही उणीवा आढळून आल्या नाहीत, असेही आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. या ब्युटीपार्लर्समध्ये केस प्रत्यारोपण, रासायनिक ब्लिचिंग व त्वचेवर उपचार करण्यात येत होते. परंतु, त्यासाठीचे अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र चालकांकडे नसल्याने कारवाई करणे आवश्यक होते. स्टीरॉईड्सच्या अतिवापरामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचेही आढळून आले. संघटनेच्या आणि ग्राहकांच्या तक्रारींची नोंद घेऊन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. ईश्वर गडाद यांनी ही कारवाई केली.
रुग्णांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने कारवाई करणे आवश्यक
याबाबत बेळगाव डेर्मेटॉलॉजी सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. शिल्पा दास्तीकोप म्हणाल्या, केवळ कायद्याची अंमलबजावणी व्हावी एवढाच आमचा हेतू नाही. तर रुग्णांचे नुकसान होऊ नये व त्यांच्या शरीराला अपाय होऊ नये हाही आमचा हेतू आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने ही कारवाई करणे आवश्यक होते. याशिवाय आम्ही पथनाट्या व टॉक शो आदी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करत आहोत.
तोतया त्वचारोग तज्ञांची वाढती संख्या
त्वचातज्ञ म्हणून काम करण्यासाठी अधिकृत वैद्यकीय पदवी आवश्यक आहेच. परंतु, प्रशिक्षणही गरजेचे आहे. उत्तम आणि मान्यताप्राप्त डॉक्टरांकडूनच उपचार घेणे हा रुग्णांचा अधिकार आहे. शहरात तोतया त्वचारोग तज्ञांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यावर नियंत्रण येणे आवश्यक आहे.
डॉ. एम. एन. पाटील, विभागप्रमुख त्वचारोग विभाग, बिम्स