जुगार अड्डयावर छापा, ४ लाखांचा मुद्देमाल जप्त; जत पोलिसांची कारवाई
जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील बाज ते अंकले रोडवर बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्यावर जत पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये सात दुचाकी सह तीन लाख ९३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आठ संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी दि. १६ एप्रिल रोजी ४.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. याबाबत जत पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल मोसीन फकीर यांनी फिर्याद दिली आहे.
अविराज महालिंग गळदे, विकास उर्फ सदाशिव प्रकाश बंडगर, उमाजी संजय कोंडीगिरे, सिद्धार्थ भागाप्पा शिंदे, नाना रंगा गडदे, पांडुरंग बाळासो खांडेकर, दत्तात्रय अण्णाप्पा हाक्के (सर्व रा. बाज, ता जत ) व चंद्रकांत शिवाजी टकले (रा. अंकले, ता. जत ) या आठ जणावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जतचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांना गोपनीय सूत्रांकडून बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने जत पोलिसांनी सापळा रचून बाज ते अंकले रोडवर बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी जुगाराची रोख रक्कम व सात दुचाकी सह तीन लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, आठ संशयित आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस हवालदार लक्ष्मण बंडगर हे करत आहेत.