12 जिल्ह्यांत 40 ठिकाणी छापे
8 भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्त विभागाचा दणका
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील धाडसत्र सुरूच असून मंगळवार सकाळी एकाच वेळी धारवाड, बेंगळूर, गदगसह 12 जिल्ह्यांत 8 अधिकाऱ्यांवर 40 ठिकाणी लोकायुक्त विभागाने छापे टाकले. यावेळी अनेक अधिकाऱ्यांकडे कोट्यावधींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. त्यांच्याजवळील मालमत्तेसंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेऊन पडताळण्यात येत आहेत.
बेंगळूर, चिक्कमंगळूर, धारवाड, शिमोगा, गदग आणि कलबुर्गीसह 12 हून अधिक जिल्ह्यांमध्ये 40 हून अधिक ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकले. शिमोग्यातील सेंद्रीय कृषी विभागाचे संशोधन संचालक प्रदीप, चिक्कमंगळूर महानगरपालिकेच्या अधिकारी लतामणी, गदग शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक ध्रुवराज बेंगळूरच्या आनेकल नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी के. जी. अमरनाथ, धारवाड मलप्रभा प्रकल्प अभियंता अशोक वल्संद, कलबुर्गी पीआरई विभागाचे कार्यकारी अभियंता मल्लिकार्जुन अलीपूर, सण्णूर ग्राम पंचायतीचे पीडीओ रामचंद्र यांच्या निवासस्थानांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवर धाडी टाकून झडती घेण्यात आली आहे.
दोन दिवसांत निवृत्ती
कलबुर्गीमध्ये दोन ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. ग्रामविकास आणि पंचायतराज अभियंता मल्लिकार्जुन अलीपूर यांच्या बेंगळूरमधील निवासस्थान, कलबुर्गी येथील दोन निवासस्थानांवर धाडी टाकण्यात आल्या. दोन दिवसांत नित्त होत असलेल्या मल्लिकार्जुन यांच्यासाठी त्यांच्या कार्यालयात मंगळवारी निवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, सकाळीच त्यांच्यावर छापे टाकण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी बेहिशेबी मालमत्तेसंबंधी कागदपत्रे व मौल्यवान वस्तू आढळल्या आहेत.
कलबुर्गी जिल्ह्यातील सन्नूर ग्रा. पं. चे पीडीओ रामचंद्र याच्या सेडम रोडवरील निवासस्थान व विजापूरमधील बोम्मनहळ्ळी येथील निवासस्थानाला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी लक्ष्य बनविले. रामचंद्र यांनी नातेवाईकांच्या नावे शेतजमिनी व इतर मालमत्ता जमविल्याचे आढळून आले आहे.
गदग शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक ध्रुवराज यांचे गदगच्या शिवानंदनगर येथील निवासस्थान, बागलकोट आणि जमखंडी येथील निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले. त्यांच्याजवळील डायरी व इतर कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासणी केली जात आहे.
बेंगळूरमध्ये आनेकल नगरपंचायतीचे प्रमुख अमरनाथ व गोविंदराजनगरमधील बेंगळूर महापालिकेचे साहाय्यक अभियंता प्रकाश यांच्या कार्यालयांसह निवासस्थानांवर धाडी टाकून तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे अनेक भूखंड व व्यापारी संकूल असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.