तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या खानापुरातील कार्यालयावर धाड
खानापूर : तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या खानापूर येथील घरासह सहा ठिकाणी लोकायुक्ताच्या पथकाने धाडी टाकल्या. यात खानापूर येथील कलमेश्वर कॉलनी येथील भाडोत्री घरावर लोकायुक्त डीवायएसपी भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली. येथून काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच खानापूर तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या चेंबरमध्ये लोकायुक्तानी धाड टाकून तपासणी केली आहे. या धाडीमुळे तहसीलदार कार्यालयासह शहरातील सर्व कार्यालयात आज भितीचे वातावरण पसरले होते. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या विरोधात विवेक तडकोड यांनी काही दिवसापूर्वी लोकायुक्त आणि जिल्हाधिकाऱ्याकडे दाखल केली होती. या तक्रारीत तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी बेनामी संपत्ती खरेदी केल्याची तक्रार केली होती. प्रकाश गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवरही तालुक्यातील सामान्य जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. सामान्य नागरिकाना कोणत्याही कामासाठी आर्थिक पिळवणूक केली जात होती. प्रत्येक कामासाठी थेट तहसीलदारांशीच संपर्क साधण्याचा दंडक तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी पाडला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यातूनही नाराजी व्यक्त होत होती. सामान्य नागरिक आणि शेतकरी प्रकाश गायकवाड यांच्या कार्यपद्धतीमुळे मेटाकुटीला आला होता.