तासवडे एमआयडीसीतील सूर्यप्रभा फार्मकेम कंपनीवर छापा
६ कोटी ३५ लाखांचे कोकेन जप्त; पाच जणांवर गुन्हे दाखल
उंब्रज :
कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत सूर्यप्रभा फार्मकेम कंपनीतून सुमारे ६ कोटी ३५ लाख रुपये किमतीचे १२७० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. बेकायदेशीररीत्या कोकेन साठवून ठेवण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तळबीड पोलिसांनी शुक्रवारी ही धडक कारवाई केली.
या प्रकरणी पाच संशयितांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली आहे.
तासवडे एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक बी-५६ येथे सुरू असलेल्या सूर्यप्रभा फार्मकेम या कंपनीत शेतीसाठी खते व औषधे तयार केली जात असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी कोकेनचा साठा करून विक्रीसाठी ते बाळगण्यात आले होते, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. पोलिसांच्या पथकाने कंपनीत छापा टाकून संशयास्पद केमिकलसह काही पिशव्या जप्त केल्या. त्यामध्ये पांढऱ्या-पिवळसर रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ सापडला. तो पदार्थ कोकेन असल्याचे फॉरेन्सिक चाचणीअंती स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पाच व्यक्तींविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरसिंह जयवंत देशमुख (रा. नांदगाव, जि. सातारा) ,समीर सुधाकर पडवळ (रा. वृंदावन सिटी, मलकापूर, कराड) ,रमेश शंकर पाटील (रा. मल्हारपेठ, ता. पाटण), जीवन चंद्रकांत चव्हाण (रा. आवार्डे, ता. पाटण) ,विश्वनाथ शिपणकर (रा. दौंड, जि. पुणे)
सदर कोकेनचे वजन १३७० ग्रॅम असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे ६.३५ कोटी रुपये इतकी आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या साठ्याची अधिकृत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
ही कारवाई होताच तासवडे एमआयडीसीतील बेकायदेशीर व्यवहारांचा भांडाफोड झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. पुढील तपास तळबीड पोलीस करीत आहेत.