आमदार सतीश सैल यांच्या निवासावर छापा
सीबीआयनंतर आता ईडीकडून कारवाई : बेंगळूर-गोव्यातील पथकाकडून सदाशिवगड येथील मालमत्तेची चौकशी
कारवार : कारवार-अंकोलाचे आमदार आणि कर्नाटक राज्य मार्केटिंग कम्युनिकेशन आणि अॅडव्हर्टायझिंग लिमिटेडचे अध्यक्ष सतीश कृष्णा सैल यांच्या सदाशिवगड येथील निवासस्थानावर बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. कारवाईवेळी आमदार सैल घरी नव्हते, असे सांगण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू होती. यापूर्वी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनीही धाड टाकून चौकशी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सैल याच्ंयावर अंकोला तालुक्यातील बेलेकेरी बंदरातील खनिजाच्या चोरट्या वाहतूक प्रकरणी कारवाईचे सत्र सुरूच आहे.
बुधवारी सकाळी 6 वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासावर धाड टाकली. गोवा आणि बंगळूर येथून दाखल झालेल्या सहा ते सात अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ईडी अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. येथे दाखल झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये दोन निमलष्करी दलातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या कारवाईवेळी परिसरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात केले होते. सतीश सैल हे मल्लिकार्जुन शिपिंग कंपनीचे मालक आहेत. या कंपनीकडून बेलेकेरी बंदरातील खनिजाची चोरटी वाहतूक विदेशात केल्याप्रकरणी माजी लोकायुक्त संतोष हेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सैल यांच्यावर प्रकरण दाखल करण्यात आले होते.
याचदरम्यान पुन्हा बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारवार-गोवा रस्त्यावरील सदाशिवगड येथील निवासावर धाड टाकून घराची झडती घेतली. धाडीच्यावेळी अधिकाऱ्यांनी सैल यांच्या घरातील काही कागदपत्रांची पाहणी केली. तथापि, कोणत्या कारणासाठी ही कारवाई करण्यात आली आहे हे समजू शकले नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतीत मौन बाळगले असून कारवाईच्यावेळी ईडीच्या हाती नेमके काय लागले हेही समजू शकले नाही. ईडीने कारवाई केल्याने सैल यांच्या समर्थकांमध्ये खळबळ माजली आहे.