For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार सतीश सैल यांच्या निवासावर छापा

12:09 PM Aug 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
आमदार सतीश सैल यांच्या निवासावर छापा
Advertisement

सीबीआयनंतर आता ईडीकडून कारवाई : बेंगळूर-गोव्यातील पथकाकडून सदाशिवगड येथील मालमत्तेची चौकशी

Advertisement

कारवार : कारवार-अंकोलाचे आमदार आणि कर्नाटक राज्य मार्केटिंग कम्युनिकेशन आणि अॅडव्हर्टायझिंग लिमिटेडचे अध्यक्ष सतीश कृष्णा सैल यांच्या सदाशिवगड येथील निवासस्थानावर बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. कारवाईवेळी आमदार सैल घरी नव्हते, असे सांगण्यात आले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू होती. यापूर्वी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनीही धाड टाकून चौकशी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून सैल याच्ंयावर अंकोला तालुक्यातील बेलेकेरी बंदरातील खनिजाच्या चोरट्या वाहतूक प्रकरणी कारवाईचे सत्र सुरूच आहे.

बुधवारी सकाळी 6 वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासावर धाड टाकली. गोवा आणि  बंगळूर येथून दाखल झालेल्या सहा ते सात अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ईडी अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली. येथे दाखल झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये दोन निमलष्करी दलातील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या कारवाईवेळी परिसरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात केले होते. सतीश सैल हे मल्लिकार्जुन शिपिंग कंपनीचे मालक आहेत. या कंपनीकडून बेलेकेरी बंदरातील खनिजाची चोरटी वाहतूक विदेशात केल्याप्रकरणी माजी लोकायुक्त संतोष हेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून सैल यांच्यावर प्रकरण दाखल करण्यात आले होते.

Advertisement

चोरट्या वाहतुकीमुळे सरकारी तिजोरीला मोठा भुर्दंड सोसावा लागला, असा सैल यांच्यावर आरोप करण्यात आला होता. 2013 मध्ये जेव्हा सैल पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते त्यावेळी त्यांना काही महिने बेंगळूर येथील कारागृहात घालवावे लागले होते. 2023 मध्ये पुन्हा एकदा सैल विधानसभेवर निवडून आले. बेलेकेरी बंदर खनिज चोरट्या वाहतूक प्रकरणी लोकप्रतिनिधींची विशेष न्यायालयाने सतीश सैल यांना 7 वर्षे जेलची आणि 44 कोटी रुपये दंड भरण्याची शिक्षा ठोठावली होती. न्यायालयाच्या या आदेशाच्या विरोधात सैल यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावत विशेष न्यायालयाच्या आदेशावर जामीन मिळविला होता.

याचदरम्यान पुन्हा बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारवार-गोवा रस्त्यावरील सदाशिवगड येथील निवासावर धाड टाकून घराची झडती घेतली. धाडीच्यावेळी अधिकाऱ्यांनी सैल यांच्या घरातील काही कागदपत्रांची पाहणी केली. तथापि, कोणत्या कारणासाठी ही कारवाई करण्यात आली आहे हे समजू शकले नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतीत मौन बाळगले असून कारवाईच्यावेळी ईडीच्या हाती नेमके काय लागले हेही समजू शकले नाही. ईडीने कारवाई केल्याने सैल यांच्या समर्थकांमध्ये खळबळ माजली आहे.

Advertisement
Tags :

.