मटका अड्ड्यावर छापा ; 13 हजार 600 रुपये जप्त
कोल्हापूर :
शहरातील जुना राजवाडा पोलिसांनी बेकायदेशिर दोन मटका अड्ड्यावर छापा टाकला. सिध्दी राजेंद्र चव्हाण (रा. संभाजीनगर, कोल्हापूर), मुसा अन्वरशा इनामदार (रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर) या दोघांना अटक केली. तर विनोद रघूनाथ मोरे (रा. राजाराम चौक, कोल्हापूर) आणि कांतीलाल महादेव व्हटकर (रा. रविवार पेठ, कोल्हापूर) हे दोघे मटका मालक पसार झाले आहे. अटक केलेल्या दोघा संशयिताकडून 13 हजार 600 रुपयांची रोकड जप्त केली.
गेल्या काही महिन्यापासून शहर आणि उपनगरात अर्थपूर्ण चर्चेनंतर मटका, जुगारी क्लब राजरोसपणे सुऊ आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर वरिष्टांनी मटका आणि जुगार क्लबविरोधी कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले. या आदेशानंतर जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी हद्दीतील जुगार अड्यावर कारवाईची मोहीम हाती घेतली. कपिलतीर्थ मार्केट येथील मटक्याच्या अड्यावर छापा टाकून, सिध्दी चव्हाण याला अटक केली. या मटका अड्याचा मटकाबुकी मालक कांतीलाल व्हटकर याच्याविरोधी गुन्हा दाखल केला. तर बोंद्रेनगर येथील मटक्याचा अड्यावर पोलिसांनी छापा टाकून, मुसा इनामदार या मटका एंजटाला अटक केली. त्याच्याकडून 7 हजार 300 ऊपयांची रोकड जप्त करीत, मटकाबुकी मालक विनोद मोरे याच्याविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.