kolhapur News : बालिंग्यात अवैध गर्भलिंग तपासणी केंद्रावर धाड; सोनोग्राफी मशीनसह मोठा जप्त मुद्देमाल
सरस्वती महिपती पार्कमधील गर्भपात रॅकेट उघडकीस
कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बालिंगा (ता.करवीर) येथील सरस्वती महिपती पार्कमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग तपासणी केंद्रावर पोलीस आणि आरोग्य विभागाने धाड टाकली.सोमवारी दुपारी टाकलेल्या या धाडीत एक गर्भलिंग निदान सोनोग्राफी मशीन, ९८ गर्भपात गोळ्यांचे किट, जेल असे साहित्य जप्त करण्यात आले.तर तपासणीसाठी आलेली एक महिला आणि एजंट दिगंबर मारुती किल्लेदार (रा.तीटवे ता. राधानगरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील (रा. बालिंगा) हा पसार झाला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की बालिंगे पाडळी खुर्द रस्त्यावर असणाऱ्या सरस्वती महिपती संकुलात बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील याने अवैधरित्या गर्भलिंग तपासणी केंद्र सुरू केले होते. याची कुणकुण पोलीस व आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार शाहूवाडी,करवीर पोलीस व आरोग्य विभागाने सोमवारी दुपारी या अवैध गर्भलिंग तपासणी केंद्रावर धाड टाकली आणि येथील गर्भपात रॅकेट उघडकीस आणले. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या एजंट व गर्भ तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे.दरम्यान तपासणी पथक आल्याचे समजताच बोगस डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील हा पसार झाला. तर ताब्यात घेतलेल्या एजंट दिगंबर मारुती किल्लेदार हा पोलिसांच्या तावडीत सापडला.या तपासणीमध्ये गर्भलिंग निदान सोनोग्राफी मशीन,९८ गर्भपात गोळ्यांचे किट, जेल असे साहित्य ताब्यात घेतले आहे.
दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीतांवर रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.शाहुवाडी पोलीस अधीक्षक अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पोलीस टीम, तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने,करवीर महिला पोलीस अधीक्षक स्नेहल टकले,खुपिरे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुधाकर ढेकळे, ॲड.गौरी पाटील या यंत्रणेने अवैद्य गर्भलिंग निदान संदर्भात दुपारी एकच्या सुमारास या अवैध केंद्रावर मोहीम राबवली.