शिरसी तालुक्यात जुगारी अड्ड्यावर धाड
49.50 लाख रुपये जप्त, 19 जण ताब्यात
कारवार : पत्यांचा अंदर-बाहर जुगार चालणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून 49 लाख 50 हजार 436 रुपये रोख, टोयोटो होंडा, कियासह चार महागड्या गाड्या आणि आयफोनसह 18 मोबाईल जप्त करण्यात आले. याप्रकरणी 19 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले श्रीमंत लोक हावेरी, दावणगेरी, चळ्ळीकेरी, अनवट्टी येथील असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई बुधवारी रात्री शिरसी तालुक्यातील भैरुंबे ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील अगसाल येथील होम स्टेमध्ये झाली. कारवारचे जिल्हा पोलीसप्रमुख दीपन यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसीच्या डीवायएसपी गीता पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक अशोक राठोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे अनिलकुमार जी. आर., रुद्राप्पा रेड्डी(वय 30), भीरप्पा तपकिरप्पा केरेगौडर (वय 42), बीरेश गोणप्पा (वय 26), शंकरगौडा विरुपक्ष गौड-पाटील (वय 48), नागराज इरप्पा रिती (वय 44), प्रदीप रुद्रप्पा अरीकेरी (वय 48), प्रशांत रामण्णा हसनाबादी (वय 35), जीबीउल्ला बाबू साब (वय 38), रेवणसिद्धप्पा वीरय्या हिरेमठ (वय 45), इशप्पा मलतेशप्पा बडीगेर (वय 40), प्रकाश मल्लप्पा सिद्धन्नवर (वय 44), मल्लिकार्जुन सोमप्पा (वय 40), बसवराज जी. आर. रामप्पा (वय 41), चमनसाब मेहबुबसाब (वय 39), बसवराज मल्लप्पा तिप्पन्नावर (वय 35), इरण्णा अभिनंदन दिनकर (वय 44), संतोष गुंडूप्पा रावनकट्टी (वय 31), वीरबसप्पा होळेबसप्पा कायसद (वय 45), चेतन एस., नागराज के. (वय 36) अशी आहेत.
विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. जुगार खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेल्या डॉ. बसवराज विजापूरसह ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांवर प्रकरण दाखल केले आहे. शिरसी ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत. कारवार जिल्ह्याचे जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण सेवा बजावत असताना त्यांनी जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर कठोर कारवाई केली होती. पाच-सहा दिवसांपूर्वी अतिशय यशस्वी ठरलेल्या नारायण यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दीपन यांची वर्णी लावण्यात आली. जुगारी अड्डे चालविणाऱ्यांनीच सरकारवर दबाव आणून त्यांची अन्यत्र बदली करण्यास भाग पाडले, अशी चर्चा रंगली आहे. एम. नारायण जिल्ह्यातून निघून जाताच कदाचित जुगारी अड्डेवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान बसवायला सुरुवात केली असावी. पण तत्पूर्वीच जिल्ह्यात नवीन रुजू झालेल्या दीपन यांनी हिसका दाखवायला सुरुवात केली आहे, असे दिसून येते. जिल्ह्यात आजअखेर जुगारी अड्ड्यावर झालेल्या कारवाईत एवढी मोठी रक्कम जप्त केली नव्हती, असे सांगण्यात आले.