उद्यापासून रायबंदर-चोडण रो-रो फेरीसेवा
नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती, लवकरच दिवाडी आणि पणजी फेरी जलमार्गांवर रो-रो फेरीसेवा
प्रतिनिधी/ तिसवाडी, जुने गोवे
रायबंदर-चोडण फेरी जलमार्गावर सोमवार दि. 14 जुलैपासून रो-रो फेरीसेवा सुरू होणार असून सध्या दोन फेरीबोट द्वारका आणि गंगोत्री चालणार आहेत. एक महिन्यानंतर सेवेचा आढावा घेतल्यानंतर दिवाडी आणि पणजी फेरी जलमार्गांवर ही सेवा सुरू करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
रायबंदर येथे मंत्री फळदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सोबत नदी परिवहन खात्याचे अधीक्षक विक्रमराजे भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.
नदी परिवहन खात्याचा वार्षिक महसूल सुमारे 60 लाख रुपये आहे, तर खर्च सुमारे 76 कोटी रुपये येतो. त्यामुळे कुठे तरी खात्याला देखील थोडी महसूल प्राप्ती होईल यासाठी चार चाकी आणि काही अवजड वाहनांना शुल्क निश्चित केले गेले आहे. त्याशिवाय रेंट-ए-कार, रेंट-ए-बाईक, प्रवासी पर्यटक यांना शुल्क आकारले जाईल. प्रवाशांसाठी देखील शुल्क ठेवण्याचा विचार होता, परंतु तूर्तास तो डावलण्यात आला आहे. लोकांच्या सोयीसाठी आम्ही तोट्यात असूनही शुल्क घेत नाही, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
रोरो फेरीबोटीत एकावेळी 15 चार चाकी, 40 दुचाकी आणि 100 प्रवासी अशी क्षमता आहे. चार फेरीबोटी नेण्याएवढी क्षमता रोरोमध्ये असून 5-7 मिनिटे प्रवास, 3 मिनिट लोडिंग, सुमारे 10-12 मिनिट वेळ या घेणार आहेत. फेरीत दोन रांगा दुचाकी, मध्य रांग चार चाकी, प्रवाशांसाठी जागा आहे.
शुल्क यादी : गोमंतकीय प्रवासी, दुचाकी मोफत
या रो-रो फेरीमध्ये तीन आणि चारचाकी गाड्यांना 30 रुपये भाडे, मासिक पास 900 रुपये आहे. मध्यम व्यावसायिक/ मध्यम प्रवासी वाहनाला 100 रुपये दर ट्रिप, मासिक पास 1500 रुपये आहे. अवजड व्यावसायिक वाहन एकूण वजन 10 टन : 400 रुपये दर ट्रिप, मासिक पास 6000 रुपये. माल (प्रति टन) : 50 रुपये, रेंट बाईक चालकासह 100 रुपये, रेंट कार 300 रुपये, प्रवासी पर्यटक 50 रुपये दर आकारले जाणार आहे.